आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागरिकांमध्ये नाराजी:सिमेंट काँक्रीट रस्त्याला गेले सहा महिन्यांतच तडे

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सातपूर काॅलनी परिसरात सहा महिन्यांपूर्वीच रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. दाेन महिन्यांपूर्वी हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्यानंतर त्या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे व भेगा पडत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रस्त्यासाठी दाेन वेगवेगळ्या पक्षांच्या नगरसेवकांनी एकत्रित येऊन तीन काेटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला हाेता.

सातपूर विभागातील जुन्या प्रभाग क्रमांक ११ मधील मनसेचे माजी नगरसेवक सलीम शेख, योगेश शेवरे व प्रभाग १० च्या भाजपच्या माजी नगरसेविका पल्लवी पाटील यांनी एकत्र येऊन मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी प्रत्येकी सव्वा कोटी याप्रमाणे पावणेचार कोटी रुपयांचा नगरसेवक निधी दिला आहे. फेब्रुवारी महिन्यात काँक्रिटीकरणाचे काम सुरू करण्यात आले हाेते. मात्र संबंधित ठेकेदाराने काम सुरू करण्यास उशिराने प्रारंभ केला. त्यामुळे नागरिकांसह व्यावसायिकांमध्येही प्रचंड नाराजी व्यक्त होत होती.

माजी नगरसेवक सलीम शेख यांनी पाठपुरावा केल्याने संथगतीने सुरू असलेल्या कामास गती आणल्याने सहा महिन्यांपूर्वी अर्ध्या रस्त्याचे काम पूर्ण केले हाेते. दोन महिन्यांपूर्वी रस्ता खुला करण्यात आला असून पुढील अर्ध्या रस्त्याचे काम अद्यापही संथगतीनेच सुरू आहे. दरम्यान, वाहतुकीसाठी सुरू केलेल्या रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी रस्ता उखडल्याने अधिकारी व ठेकेदाराच्या संगनमताचे पितळ उघडे पडले आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून रस्त्याची वाट लागली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे

पालिका अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमताने भ्रष्टाचार फोफावत आहे. १२ मीटर असलेल्या रस्त्याचे केवळ ८ मीटरचे काँक्रिटीकरण केले आहे. या निकृष्ट कामाचे बिल अदा झाल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशारा मनपास दिला आहे. - सलीम शेख, माजी नगरसेवक

आंधळ दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय
महापालिकेच्या कामांमध्ये मलिदा खाण्यासाठी अधिकाऱ्यांची धडपड सुरू असते. सार्वजनिक कामांमध्ये भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकारी व ठेकेदारांना वठणीवर आणण्यासाठी काळे फासले पाहिजे. - राजू बडगुजर, स्थानिक नागरिक

अधिकाऱ्यांच्या वेतनातून पैसे कपात करावेत
काही दिवसांनी रस्ता दुरुस्तीच्या नावाखाली पुन्हा त्याच कामाची नवीन निविदा काढून जनतेच्या पैशांची लूट केली जाईल. निकृष्ट कामाची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांच्या वेतनातून पैसे कपात करावी. -गीता जाधव, सामाजिक कार्यकर्त्या

नागरिकांच्या पैशांची लूट थांबवावी
सर्वसामान्य जनतेच्या घामाच्या पैशातून पालिकेचे कर भरले जातात. मात्र, अधिकारी व ठेकेदारांच्या संगनमतामुळे नागरिकांच्या डाेळ्यात धूळ फेकली जात आहे. सर्वसामान्यांच्या पैशांची लूट थांबवावी. - अमोल कदम, स्थानिक रहिवासी

बातम्या आणखी आहेत...