आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागेल्या तीन दिवसांपासून हनुमान जन्मस्थळावरून नाशिकमध्ये साधू- संतांमध्ये वादविवाद सुरू आहे. कर्नाटकमधील किष्किंधा येथील स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी हनुमानाचे जन्मस्थळ हे किष्किंधा असल्याचा दावा नाशिकमध्ये येऊन केला. त्यानंतर हा वाद वाढला. नाशिकमधील साधूंनी मात्र अंजनेरी हेच जन्मस्थान असल्याचा दावा करत गोविंदानंद यांच्याविरोधात धर्मशास्त्रार्थ सभेचे आयोजन केले होते, त्या वेळी गोविंदानंद यांच्यावर माइक उगारण्यापर्यंत प्रकरण गेले होते. दाेन्ही पक्ष आपापल्या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर शास्त्रार्थ सभेसाठी खास आलेले रामजन्मभूमीचे मुख्य पुजारी गंगाधर पाठक यांनी मात्र अंजनेरी हेदेखील जन्मस्थळ असल्याचे खंडन कुणीही करू शकत नाही, असे सांगून नाशिकचा दावा मजबूत केला.
नाशिक येथे बुधवारी झालेल्या वादग्रस्त शास्त्रार्थ सभेनंतर स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी मंचावर स्वामी गोविंदानंद आणि गंगाधर पाठक यांच्यासह महंत अनिकेत शास्त्री हे उपस्थित होते. या वेळी अनिकेत शास्त्री यांनी अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मठिकाण असल्याचे सांगून अप्रत्यक्षपणे गोविंदानंदांच्या भूमिकेला विरोध दर्शवला.
गोविंदानंद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, वाल्मीकी रामायण हा ग्रंथ सर्वात मोठा पुरावा आहे, त्यात हनुमानाचे जन्म ठिकाण हे किष्किंधा असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे.’ त्यांच्या या वक्तव्यानंतर पत्रकारांनी अंजनेरीबाबत विचारले असता ते स्पष्टीकरण देऊ शकले नाही.
त्यापूर्वी पाठक यांनी सांगितले की, सरकारने या दोन्ही जन्मस्थळांवरून अजून स्पष्टपणे अहवाल दिलेला नाही. देशात विविध तिथींना चार हनुमान जयंती साजरी होते. तसेच पुराणांमध्ये असलेल्या दाखल्यावरूनच हनुमानाची दोन ठिकाणी जन्मस्थळे दिसून येतात. मंगळवारी झालेल्या सभेबाबत नाराजी व्यक्त करीत ते म्हणाले, ‘शास्त्रापेक्षा शस्त्र घेणे योग्य नाही. चर्चेच्या आखाड्यामध्ये कुस्ती नाही, तर ग्रंथावरून विचारमंथन झाले पाहिजे. अंजनेरी येथे हनुमानाचे जन्मस्थान असल्याचे ब्रह्मपुराणात आहे. एका कल्पामध्ये हनुमानाचे जन्मस्थळ हे अंजनेरी असावे, असे सांगितले आहे. अंजनेरी येथे जन्मभूमी असल्याचेही ब्राह्मकल्पामध्ये साांगितले आहे.’
गोविंदानंद सरस्वती यांची विचारधारा लवकरच बदलेल
देशात चार ठिकाणी वेगवेगळ्या जयंती साजरी केली जाते. तसेच भागवत कथेमध्येही याचा उल्लेख केलेला असल्याचे दिसले. ग्रंथामध्ये असलेल्या वाक्यांचा अपमान करणार नाही. त्यामुळे कुणाचीही बाजू न घेता अंजनेरी हे ब्राह्मकल्पामध्ये जन्मस्थान असल्याचे समजते. त्यामुळे गोविंदानंद यांची विचारधारा बदलेल.
- गंगाधर पाठक, मुख्य पुजारी अयोध्या रामजन्मभूमी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.