आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अधिनस्त १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३० खाटांचे रुग्णालय सुरू करण्यासाठी म्हसरुळ शिवारातील महापालिकेच्या मालकीच्या १४ हेक्टर जागेचे विद्यापीठाकडे हस्तांतरण झाले. मात्र भूमिपूजन झालेले नाही. दुसरीकडे, उस्मानाबाद व रायगड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला आवश्यक मंजुरी मिळून निधीही उपलब्ध झाल्याकडे भाजपचे नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार अॅड. राहुल ढिकले यांनी लक्ष वेधल्यानंतर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्व प्रक्रिया करून इमारत बांधकामाच्या भूमिपूजनाचा नारळ वाढवला जाईल, असे आश्वासन विधानसभेत दिले.
नाशिकमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ असल्यामुळे या ठिकाणी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा उपयाेग करून शासकीय मेडिकल कॉलेज सुरू केल्यास त्याचा रुग्णांनाही फायदा होईल असा विचार पुढे आला. मध्यंतरी विद्यापीठाच्या कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत काही महिन्यांपूर्वी झालेल्या विद्यापीठ इमारतीच्या नूतनीकरण कार्यक्रमातही विद्यापीठाच्या वतीने ही मागणी पुढे रेटण्यात आली होती.
त्यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी यासंदर्भातील प्रस्तावाला लवकरच मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी दिली जाईल, असे घोषित केले होते. मात्र पुढे नानाविध कारणांमुळे विलंब होत होता. ही बाब लक्षात घेत आमदार ढिकले यांनी यासंदर्भात विधानसभेत लक्ष वेधल्यानंतर तसे आश्वासन मिळाले.
..असा आहे प्रस्ताव म्हसरुळ शिवारातील गट नंबर २५७ मध्ये १४ हेक्टर ३१ आर इतकी महापालिकेच्या मालकीची जमीन असून ही जागा विनामूल्य हस्तांतरित करण्यात आली आहे. या ठिकाणी महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे ६२७ कोटी ६२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित असून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमाच्या तरतुदीनुसार अभ्यासक्रमांचे व इतर शुल्क निश्चित करून आकारणी करण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे. येथे ४३० खाटांचे रुग्णालय असणार असून यात १०० विद्यार्थी क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय केले जाईल. जवळपास १५ विषयांमध्ये वर्षनिहाय ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा निर्माण करण्यास मंजुरी मिळणार आहे.
माफक दरात चांगले उपचार होणार
सद्यस्थितीत वैद्यकीय उपचार हे न परवडणारे आहे. गंभीर व दुर्धर आजारासाठी अनेक रुग्णांना मुंबई, पुण्यात जावे लागते. ही बाब लक्षात घेत नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पाठपुरावा सुरू आहे. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आपले मेडिकल हॉस्पिटल व कॉलेजची प्रक्रिया रखडली असल्यामुळे शासनाचे लक्ष वेधले. त्यावर वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी पावसाळी अधिवेशनापूर्वी भूमिपूजन केले जाईल असे स्पष्ट केले. हे हॉस्पिटल लवकर उभारले गेल्यास रुग्णांना माफक दरात चांगले उपचार मिळतील.
- अॅड राहुल ढिकले, आमदार, नाशिक पूर्व
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.