आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:पीएम केअर फंडातील 60 व्हेंटिलेटर्स सुरू करण्यास कंपनीने दिला नकार

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • काम सोडल्याचे कंपनीने दिले नाशिकच्या महानगरपालिकेला अजब उत्तर

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये रुग्णांचा ऑक्सिजन व व्हेंटिलेटरअभावी जीव जात असताना पीएम केअर फंडातून महापालिकेला केंद्र शासनाने पाठवलेले ६० व्हेंटिलेटर्स पडून असल्याचे वृत्त झाल्यानंतर गेल्या दहा दिवसांपासून पाठपुरावा करणाऱ्या वैद्यकीय विभागाला आता ठेकेदार कंपनीने आम्ही काम सोडले, असे अजब उत्तर देत हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे.

स्थानिक पातळीवर व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे,असेही कंपनीकने सांगितल्याने महापालिकेने आता संबंधित कंपनीचा करारनामा, त्यातील अटी - शर्थी तपासून कायदेशीर कारवाई करण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये गंभीर अवस्थेतील रुग्णांची संख्या शेकडोंच्या घरात असताना व्हेंटिलेटर मात्र नवीन बिटको रुग्णालयात २३ तर डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात १७ इतके होते. विशेष म्हणजे त्यातील ३५ व्हेंटीलेटर्स हे गेल्यावर्षी जून-जुलै महिन्यात महापालिकेला पीएम केअर फंडातून प्राप्त झाले होते. अशातच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पीएम केअर फंडातूनच ६० नवीन व्हेंटीलेटर्स महापालिकेच्या रुग्णालयांसाठी प्राप्त झाल्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र, व्हेंटिलेटर्सच्या इन्स्टॉलेशनला सुरूवात केल्यानंतर कनेक्टर, ट्युबिंगसारखे भाग पाठवले गेले नसल्यामुळे ते सुरू कसे करायचे हा प्रश्न होता. हे भाग नसल्यामुळे हे व्हेंटिलेटर खोक्यांमध्ये बंद अवस्थेत ठेवलेले आहेत. एकीकडे रुग्णांचा जीव जात असताना किरकोळ सुटे भाग नसल्यामुळे व्हेंटिलेटर नादुरुस्त ठेवले जाण्याच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण होते. यासंदर्भात वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने ठेकेदार कंपनीशी संपर्क साधून तीन दिवसात व्हेंटिलेटर सुरू करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे आदेश दिले होते.

महापालिकेच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी कंपनीशी वारंवार संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून आता आम्हीच काम सोडले आहे अशी उत्तरे मिळत आहे. स्थानिक पातळीवर व्हेंटिलेटर सुरू करण्याबाबत सांगितले जात असले तरी हे महत्त्वपूर्ण सुटे भाग कसे मिळणार हा प्रश्न कायम आहे.

बातम्या आणखी आहेत...