आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक अधिकारी:प्रारूप मतदार यादी उद्या हाेणार प्रसिद्ध;  ८ डिसेंबरपर्यंत दावे, हरकतीसाठी मुदत

नाशिक5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जानेवारी, २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने ९ नोव्हेंबर, २०२२ रोजी प्रारूप मतदार यादी जाहीर हाेणार आहे. नोंदी तपासून मतदारांनी या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डी. गंगाथरन यांनी केले आहे. विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ९ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या कालावधीत प्रारूप मतदार यादीबाबत असलेले दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. मतदारांसाठी प्रारूप मतदार याद्या https://ceo.maharashtra.gov.in किंवा https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १ जानेवारी, १ एप्रिल, १ जुलै व १ ऑक्टोबर २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार जर पात्र मतदार २०२३ या वर्षातील जानेवारी, एप्रिल, जुलै व ऑक्टोबर या महिन्याच्या १ तारखेला किंवा त्याआधी वयाची १८ वर्षे पूर्ण करीत असतील अशा मतदारांना ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरू होणाऱ्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत अर्ज क्रमांक ६ भरून आगाऊ मतदार नोंदणी करता येणार आहे. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यातील नोंदी तपासून नमुना-७ भरून मतदार यादीतील मयत व दुबार मतदारांची नावे वगळता येणार आहेत. तसेच नमुना-८ नुसार मतदार यादीतील दुरुस्ती किंवा पत्त्यात बदल करता येणार आहेत.

मतदार यादी आधारशी संलग्न करण्याची मोहीमदेखील सुरू असून मतदारांना त्यांचा आधार क्रमांक मतदार यादीसोबत जोडता येणार आहे. दरम्यान २६ डिसेंबर पर्यत प्राप्त दावे हरकती निकाली काढले जातील. आणि मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी गुरुवार, ५ जानेवारी २०२३ रोजी होईल.

बातम्या आणखी आहेत...