आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठी ऑडिट:नाशिक, कोराडी, चंद्रपूरसह राज्यातील औष्णिक विद्युत केंद्रांची कार्यक्षमता घटली, वीज महागली

नाशिक, नागपूर, भुसावळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पर्यावरण संरक्षणाचे निकष : कालबाह्य तंत्रज्ञानामुळे विद्युत निर्मिती पडत आहे महाग

संकलन : दीप्ती राऊत (नाशिक), हेमंत जोशी (भुसावळ), अतुल पेठकर (नागपूर)

केंद्रीय वीज निर्मिती प्राधिकरणाच्या सप्टेंबर २०१५ च्या अहवालानुसार पंचवीस वर्षे पूर्ण झालेल्या औष्णिक विद्युत केंद्रांची कार्यक्षमता संपुष्टात आल्याचे जाहीर करण्यात आले होते. कालबाह्य तंत्रज्ञान आणि बदलेले पर्यावरण संरक्षणाचे निकष यामुळे या केंद्रांमधील वीज निर्मिती महाग पडत असल्याने मार्च २०१६ ते मे २०१९ या कालावधीत ते बाद करण्यात यावेत किंवा त्यांच्या नूतनीकरणाचा वा आधुनिकीकरणाचा विचार करावा अशा सूचना देण्यात आल्या होत्या.

त्यानुसार, नाशिकच्या एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रातील २१० मेगावॅट निर्मिती क्षमतेच्या युनिट ३ च्या नूतनीकरण प्रस्तावास २०१४-१५ मध्ये मान्यता देण्यात आली. दरम्यान, कोराडी येथील युनिट ६ चे नूतनीकरण हा पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवावा आणि त्याच्या परिणामांनुसार नाशिकसह अन्य केंद्रांच्या नूतनीकरणाचा विचार करावा असा निर्णय महाजनकोने घेतला. मात्र, या नूतनीकरणासाठी प्रत्येकी ४०० ते ४५० कोटी रुपयांचा निधी लागणार असून त्यानंतरही उत्पादित होणारी वीज महाग पडत असल्याने हे सर्व नूतनीकरण प्रकल्प गुंडाळण्याचा निर्णय झाल्याचे सांगण्यात आले आहे.

चंद्रपूर : दोन संच कालबाह्य

सध्याच्या औष्णिक विद्युत केंद्रांमधील सब क्रिटिकल तंत्रज्ञानही कालबाह्य झाले आहे. सध्या तंत्रज्ञान बदलले आहे. कार्यक्षमता वाढवणारे, कमी इंधनात जास्त वीज निर्मिती करणारे, पाणी व कोळशाची बचत करणारे तसेच प्रदूषण कमी करणारे अॅडव्हान्स सुपर टेक्नाॅलाॅजिकल तंत्रज्ञान आले आहे. चंद्रपूर औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील २१० मेगावॅटचे दोन संच कालबाह्य असून ते सध्या बंद आहेत. एक संच २०१४ व एक २०१६ मध्ये बंद झाला. हे संच पाडण्यासाठी बोलावलेल्या ई-निविदा यशस्वी होऊ न शकल्याने तूर्तास संच उभे आहेत. लाॅकडाऊन उठल्यानंतर परत नव्याने ई-निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असे चंद्रपूर औष्णिक निर्मिती केंद्रातील सूत्रांनी सांगितले.

कोराडी : पाच कालबाह्य संचांपैकी चार जमीनदोस्त

कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रात एकूण दहा संच होते. त्यातील ५ संच कालबाह्य केले. या पाच कालबाह्य संचांपैकी ४ जमीनदोस्त केले असून पाचवा अजून डिसमेंटल करायचा असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यात पाडलेले पहिले चार संच प्रत्येकी १२० मेगावॅटचे होते. तर, पाचवा २०० मेगावॅटचा आहे. सध्या २१० मेगावॅटचे दोन व ६६० मेगावॅटचे तीन संच कार्यरत आहेत. यातील पहिला संच जून १९७४ मध्ये, दुसरा मार्च १९७५, तिसरा मार्च १९७६ व चौथा जुलै १९७६ मध्ये उभारण्यात आला. तर, पाचवा २०० मेगावॅटचा संच जुलै १९७८ मध्ये उभारला. यातील पहिले चार संच २०१० मध्ये कालबाह्य जाहीर करण्यात आले. त्या नंतर ते उपयोगात नव्हते. त्यामुळे रीतसर निविदा काढून ते पाडण्यात आले. या व्यतिरिक्त महावितरणने संच क्र. ५ ही कालबाह्य झाल्याने बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याचा परिणाम वीज निर्मितीवर होत होता, अशी माहिती कोराडी औष्णिक वीज निर्मिती केंद्रातील सूत्रांनी दिली.

भुसावळ : कालबाह्य वीज निर्मिती संच आहेत उभेच्या उभेच

भुसावळ| औष्णिक वीज निर्मिती केंद्रात देखील वर्ष १९८२ मध्ये कार्यान्वित झालेल्या २१० मेगावॅट संच कालबाह्य होऊनही वापरात आहे. गेल्या दीड वर्षापासून महागड्या वीज निर्मितीमुळे तो बंद आहे. भुसावळ औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील १८६८ मध्ये स्थापित ६२.५ मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक १ हा कालबाह्य झाल्याने वर्ष २००९ मध्ये बंद झाला. त्याचे पुनरुज्जीवन करून वर्ष २०११ मध्ये ६६० मेगावॅटचा सुपर क्रिटिकल कोळसाधिष्ठीत प्रकल्पाला मंजुरी मिळाली होती. या प्रकल्पाचे काम सध्या सुरू आहे. तर, १९७९ मध्ये स्थापन झालेल्या २१० मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक दोनला वर्ष २०१७ मध्ये कायमस्वरूपी बंद करण्यात आले होते. याच प्रकारे १९८२ मध्ये स्थापन झालेल्या २१० मेगावॅटचा संच क्रमांक तीन देखील कालबाह्य झाला असून त्याबाबत मात्र महानिर्मिती प्रशासनाने अद्याप निर्णय घेतला नाही. हा संच कार्यान्वित असला तरी गेल्या दीड वर्षापासून यातून होणारी वीज निर्मिती महागडी असल्याच्या कारणाने तो बंदच आहे. मागणी वाढून हा संच मेरिट ऑफ डिस्पॅचमधून बाहेर आल्यास त्यातून वीज निर्मिती होऊ शकेल.

लाॅकडाऊनमुळे विजेचा वापर कमी:

२५ वर्षांपेक्षा अधिक आयुर्मान असलेले औष्णिक वीज निर्मितीचे संच बंद करण्याबाबतचे धोरण भुसावळच्या २१० मेगावॅट संच तीन बाबत अवलंबले गेले नाही. दरम्यान, २३ मार्चपासून कोरोना लॉकडाऊनमुळे राज्यातील विजेचा वापर कमी झाल्याने हे भुसावळातील कालबाह्य झालेल्या संच क्रमांक तीन सोबतच विस्तारीत ५०० बाय दोनचे संचही बंदच आहेत. त्यामुळेच भविष्यात या प्रकल्पातून वीज निर्मिती किती होते याकडेही लक्ष असणार आहे.

नाशिक : मागणीअभावी तिन्ही युनिट्स बंद

लॉकडाऊनच्या काळात विजेची मागणी कमी झाल्याने एकलहरे औष्णिक विद्युत केंद्रातील युनिट ३ हे २५ मार्चपासून बंद आहे. येथील युनिट ४ आणि ५ या दोन्ही संचांतील वीज निर्मिती डिसेंबर २०१९ पासूनच बंद आहे. कार्यक्षमता संपली असली तरी मागणी असेल तर या संचांमधून १८० ते १९० मेगावॅटपर्यंत वीज निर्मिती करता येत असल्याची माहिती उपमुख्य अभियंता मोहन आव्हाड यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली. वयोमर्यादा उलटल्याने, त्यांच्या कार्यक्षमतेवर थोडा परिणाम होत असला तरी वार्षिक देखभाल सुरळीत सुरू असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने कोणताही धोका नसल्याचे आव्हाड यांनी स्पष्ट केले. येथील वीज निर्मितीच्या पाच संचांपैैकी १४० मेगावॅटचे दोन संच कालबाह्य झाल्याने २०११ मध्ये बंद करण्यात आले आहेत. वर्ष २०१४-१५ मध्ये त्याच्या भंगार विक्रीसाठी निविदा काढण्यात आली असून मागील वर्षी त्यास मंजुरीही देण्यात आली आहे. तूर्तास नाशिकच्या अन्य कोणत्याही संचाच्या नूतनीकरणाचा शासनाचा विचार नाही.

राज्यातील औष्णिक विद्युत केंद्राची सद्य:स्थिती

- नाशिक युनिट ५ : लॉकडाऊनमुळे २५ मार्चपासून बंद

- नाशिक युनिट ३ : मागणी अभावी डिसेंबर २०१९ पासून बंद

- नाशिक युनिट ४ : मागणी अभावी डिसेंबर २०१९ पासून बंद

- भुसावळ युनिट ३ : गेल्या दीड वर्षापासून बंद

- भुसावळ विस्तारित संच : लॉकडाऊनमुळे २३ मार्चपासून बंद

- चंद्रपूर युनिट १ :२०१४ पासून बंद

- चंद्रपूर युनिट २ : २०१६ पासून बंद

0