आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा सातपूर बस स्थानकाला लागलेली घरघर काही केल्या कमी हाेईना. तीन काेटी रुपये खर्चून या स्थानकाचे काम पूर्ण झाले मात्र अद्यापही बांधकाम पूर्णत्वाचा दाखल न मिळाल्याने आणि पूर्वीच्या ठेकेदाराने ५२ हजार रुपयांचे वीजबिल न भरल्यामुळे स्थानकाचे लाेकार्पण रखडले आहे. गेल्या दहा वर्षात तीन वेळा भूमिपूजन झालेल्या सातपूर बस स्थानकाच्या लाेकार्पणाला काही केल्या मुहूर्त लागेना. ११ फेब्रुवारीला सातपूर येथे झालेल्या भाजपा प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीप्रसंगी उपस्थित उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे निश्चित झाले हाेते.
मात्र पूर्वीच्या ठेकेदाराने बांधकामासाठी घेतलेल्या वीज जाेडणीचे ५२ हजार रुपयांचे बिल थकविले आहे. आता वीज कंपनी पैसे भरल्याशिवाय नवीन जाेडणी देण्यास तयार नाहीत. हे संपूर्ण काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत झालेले असल्याने राज्य परिवहन मंडळाने बांधकाम विभागास पत्र देऊन थकीत वीज बिल भरण्यास सांगितले आहे. उद्घाटन हाेणार म्हणून आयुक्त डाॅ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी स्थानक परिसराची पाहणी करून आजूबाजूचे सर्व अतिक्रमणही हटवले आहे. या स्थानकात सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत. महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरकडून येणाऱ्या सर्व बसेस या स्थानकावर थांबणार असल्याने प्रवाशांना लाभ हाेणार आहे.
वीज कंपनीने दिला नकार
राज्य परिवहन विभागाने वीज जाेडणी घेण्यासाठी वीज वितरण कंपनीकडे अर्ज केला. मात्र बस स्थानकाचे काम केलेले ठेकेदार प्रतीक पी. बडगुजर यांनी बांधकामासाठी वारपलेल्या वीज देयकाची रक्कम अदा न केल्यामुळे नवीन जाेडणीस नकार दिला. त्यामुळे परिवहन मंडळाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र पाठवून ठेकेदारास आपल्या स्तरावरून बिल भरण्यास सांगण्याची विनंती केली आहे.
बसस्थानकात अनेक सुविधांची उपलब्धी
या स्थानकात सर्व प्रकारच्या सेवा सुविधा उपलब्ध आहेत. महिला व पुरुष कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृहाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वरकडून येणाऱ्या सर्व बसेस या स्थानकावर थांबणार असल्याने प्रवाशांना लाभ हाेणार आहे.
हस्तांतराची प्रक्रिया सुरू
वीज बिलाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र दिले आहे. त्यांच्याकडून हा प्रश्न मार्गी लावला जाईल. आमच्याकडून हस्तांतराची प्रक्रिया सुरू झाली आहे. दहा-पंधरा दिवसांत त्याचे उद्घाटनही होईल. - अरुण सिया, विभाग नियंत्रक, राज्य परिवहन मंडळ
लवकरच हाेणार उद्घाटन
वीज बिलाचा व उद्घाटनाचा काहीही संबंध नाही. मुळात ठेकेदाराची अनामत रक्कम जमा असते. त्यामुळे बिल भरण्याची अडचण नाही. लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तारीख घेऊन स्थानकाचे उद्घाटन केले जाईल. - आमदार सीमा हिरे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.