आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअनेक दिवसांपासून फार्मसी प्रवेश प्रक्रिया रखडली आहे. राज्यशासनाच्या गलथानपणामुळे या प्रक्रियेत मात्र विद्यार्थी भरडला जात आहे. औषधनिर्माणशास्त्र विभागाच्या पदवी व पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया अजूनही रखडलेलीच आहे. तर दुसरीकडे तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे प्रवेश अर्जासाठी वारंवार मुदतवाढ दिली जात आहे. सर्वच सावळा गोंधळ असून यावर तत्काळ निर्णय न घेतल्यास राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने अमोल पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
डी.फार्मसी या पदविका अभ्यासक्रमाच्या अर्जासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान, मुदतवाढीमुळे पुढील प्रवेशाचे वेळापत्रक कोलमडले आहे. बारावीनंतर औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदविका अभ्यासक्रम असलेल्या डी.फार्मसीला प्रवेश दिला जातो. एकीकडे दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमाची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झालेली असून वर्गही सुरू झाले आहेत. तर दुसरीकडे डी. फार्मसीची प्रक्रिया मात्र खोळंबली आहे.
अनेक व्यावसायिक अभ्यासक्रमांची दुसऱ्या फेरीची प्रक्रिया आटोपत आलेली असताना, औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अद्यापही ठप्प आहे. प्रवेश क्षमता मान्यतेच्या गोंधळामुळे प्रवेश प्रक्रिया खोळंबल्याची स्थिती असून विद्यार्थी व पालक मेटाकुटीला आले असून, प्रवेश प्रक्रियेपुढील ग्रहण संपणार कधी? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संपूर्ण राज्यभरातून लक्षवेधी पद्धतीने विद्यार्थी व पालक यासंदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे व प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील यांच्याकडे तक्रार करत आहे. याच अनुषंगाने प्रदेश सरचिटणीस अमोल पाटील यांनी तंत्रशिक्षण संचालनालयास इशारा दिला आहे कि, फार्मसी प्रवेश प्रक्रियेचा गुंता त्वरित सोडवा अन्यथा प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.
यापूर्वीच विद्यार्थ्यांना आधीच निकाल उशिरा लागल्याने पुन्हा ही प्रक्रिया रखडले असताना प्रवेश प्रक्रियेसाठी आणि पुन्हा या प्रक्रियेसाठी निर्माण होत असलेला गुंता सोडविला जात नाही एकूणच या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे भवितव्यच टांगणीला लागल्याचे दिसून येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.