आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंद्रायणी तांदळाचा सुगंध.., गुलाब, मोगऱ्यांची दरवळ.., सेंद्रिय गुळाची जिभेवर रेंगाळणारी चव.., तर आदिवासी भागातील लक्ष वेधून घेणाऱ्या रानभाज्या.., नाकाला ठसका देणारा खान्देशी अन् वऱ्हाडी मसाला.., जिभेचे चोचले पुरविणारी बोंबिलची चटणी अन् सोबतीला नागलीची गरमागरम भाकरी या अशा साऱ्या मेन्यूने डोंगरे वसतिगृहावर सुगंध दरवळला. शहरवासीयांची प्रदर्शनवारी उत्साहवर्धक होत असल्याचे चेहऱ्यावर समाधान दिसत होते. निमित्त होते कृषी विभागाने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचे.
कृषिमालाला चालना मिळावी, शेतकऱ्यांना विक्रीचे तंत्रज्ञान अवगत व्हावे तर ग्राहकांना स्वच्छ आणि ताजा भाजीपाल्यासह तांदूळ, नागली, कांदा हे रास्त दरात मिळावे म्हणून राज्य शासनाने प्रत्येक जिल्ह्यात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक जिल्हा कृषी विभागाच्या वतीने डोंगरे वसतिगृह येथे ६ ते १० डिसेंबरदरम्यान कृषी महोत्सवाचे आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विभागीय सहसंचालक मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक राजेंद्र निकम, संजय सूर्यवंशी, दिलीप देवरे, गोकुळ वाघ, सदूभाऊ शेळके, सागर खैरनार आदी उपस्थित होते.
डोंगरे वसतिगृह मैदानावरील या कृषी प्रदर्शनामध्ये आदिवासी बांधवांनी विविध जातींचा तांदूळ, तसेच रानभाज्या, बचतगटांनी तयार केलेल्या अगरबत्ती, नागलीचे पापड, मसाले, मशरूमचे पापड, मशरूमचा रस, शेतकऱ्यांनी आणलेला लाल आणि उन्हाळ कांदा, पुरण पावडर, तसेच बांबूपासून तयार केलेल्या खेळण्या, गावरान शेंगदाणे, हरभराडाळ, बाजरी, तेल खरेदीसाठी ग्राहकांनी गर्दी केली होती. तर मोहाडी येथील विविध प्रकारचे फुले लक्ष वेधून घेत होते. तसेच गायत्री नर्सरीने तयार केलेली विविध रोपे या ठिकाणी नागरिकांना आणि शेतकऱ्यांना पहायला मिळत होती. पहिल्याच दिवशी नागरिकांची गर्दी वाढल्याने कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांंना आगामी तीन दिवसांसाठी गर्दीचे नियोजन करावे लागणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.