आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याच्या शिकारीचा थरार:भुकेल्या बिबट्याचा बकरीवर सहा तास ताव, तांबडे फुटताच ठोकली धूम

रमेश देसले | बागलाण (जि.नाशिक)एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 17 तासांनंतर झाला जेरबंद

बागलाण (जि.नाशिक) तालुक्यातील आराईसह ठेंगोडा, लोहोणेर, सावकी भागात गेल्या काही दिवसांपासून बिबट्यांचा मुक्त संचार सुरू आहे. परिसरात किमान ४ ते ६ बिबटे असल्याचे शेतकरी सांगत आहेत. आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांची पाळीव कुत्रे, बकऱ्या व जनावरांवर बिबट्याने हल्ले केले आहेत. बिबट्याच्या या दहशतीमुळे गाव व परिसर गेल्या दोन महिन्यांपासून दहशतीखाली असल्याने रात्री मळ्यात जाणे व पिकांना पाणी देणेही शेतकरी टाळत आहेत. अशातच शनिवारी (दि. ८) रात्री आराई येथील रुम्हणे शिवारातील देविदास नथू आहिरे यांच्या शेतातील बकरीवर बिबट्याने हल्ला केला. पिंजरा नसल्याने बिबट्याला पकडणे कठीण असल्याने काही जणांनी हा थरार मोबाइलमध्ये कैद केला. बिबट्याच्या शिकारीचा लाइव्ह थरार देविदास आहिरे यांच्याच शब्दांत.... शनिवारी (दि. ८) रात्री जेवणानंतर आम्ही घरात बसलो होतो. सव्वादहाच्या सुमारास अचानक बकरीचा मोठमोठ्याने आवाज आला. मी मुलगा विशालसह ताडकन बाहेर आलो. तोपर्यंत घराबाहेर बांधलेल्या बकरीच्या नरडीचा बिबट्याने घोट घेतला होता. बकरी तडफडून पाय झटकत होती. बॅटरी व काठ्या घेऊन येताच बिबट्याने धूम ठोकली. विशालने परिसरातील मित्र विनोद आहिरे यांना फोनवरून माहिती दिली. पण सुरुवातीला त्यांना खात्री वाटत नव्हती. मग विशालने मेलेल्या बकरीचा फोटो व्हॉट्सअॅपवर पाठवला. विनोद तातडीने दाखल झाला. बकरीवरील हल्ल्याचे फोटो तो गावातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर टाकत असतानाच रात्री ११ च्या सुमारास बिबट्या पुन्हा आला व शेतातील चारा रचलेल्या हुडीवर जाऊन बसला.

विशालने आराई येथील पंचायत समितीचे माजी सभापती परशुराम आहिरे यांना माहिती दिली. आहिरे यांनी पोलिस पाटील कारभारी भदाणे यांना व वनरक्षक काकुळते व देवकाते यांना माहिती दिली. वनविभागाचे दोन्ही कर्मचारी, आहिरे व पोलिस पाटील भदाणे असे चौघे तसेच परिसरातील शेतकरी रात्री सव्वा बाराच्या सुमारास मळ्यात पोहोचले. बिबट्या पुन्हा बकरीला खाण्यासाठी येईल म्हणून आम्ही सर्वजन शेतातील काद्यांच्या कुडाच्या चाळीत बसून राहिलो. रात्री १ च्या सुमारास पुन्हा बिबट्या बकरीला खाण्यासाठी आला. बकरीला घेऊन जाण्याचा तो प्रयत्न करु लागला. मात्र आम्ही बकरीला दोरीने बांधली असल्याने त्याला ती उचलून नेता आली नाही. बिबट्या तेथेच बकरीचे लचके तोडू लागला. पिंजरा नसल्याने बिबट्याला पकडणे कठीण असल्याने आमच्यापैकी एकाने व्हॉट्सअॅपवर बिबट्याची शिकार कैद केली. आमच्या थोड्याफार आवाजाची चाहूल लागताच बिबट्या रात्री १-४५ च्या सुमारास पुन्हा माघारी गेला. मात्र, पोटात भूक असल्याने पंधरा ते वीस मिनिटांनी रात्री २ च्या सुमारास तो पुन्हा आला. मात्र, थोडा आवाज होताच तो माघारी फिरत असे. परिसरात एकाहून अधिक बिबटे असल्याने इतरही बिबटे येतात का या प्रतीक्षेत आम्ही बसलो होतो. परिसरात किमान ४-५ तरी बिबटे असावे अशी चर्चा रंगली होती. वनविभागाने बिबट्यास जेरबंद करण्यासाठी पिंजरे लावले आहे. मात्र, हे बिबटे पिंजऱ्याच्या आजूबाजूने निघून जातात पण आत जात नाहीत. जेथे पिंजरा लावला जातो तेथे हे बिबटे जाण्याचेही टाळतात. एक मादी बिबट्या व तिचीच तीन ते चार पिल्ले असल्याची आमची चर्चा सुुरू असतानाच तोच बिबट्या रात्री साडेतीनच्या सुमारास पुन्हा आला व त्याच बकरीला पुन्हा खात निघून गेला. पहाटे साडेचार वाजेपर्यंत हे सुरूच होते. मात्र त्यानंतर बिबट्या पुन्हा फिरकला नाही. सरपंच मनीषा आहिरे यांच्या कानावर ही घटना घातली असता त्यांनी वनविभागाशी संपर्क साधून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी केली. वनपरिक्षेत्र अधिकारी रमेश साठे यांनाही आम्ही घटनेची माहिती दिली. परंतु उपाशी असलेला प्राणी बकरी खात असताना पकडण्याचा प्रयत्न केला असता तर त्याने माणसावर हल्ला केला असता अाणि ते जीवावर बेतले असते. त्यामुळे त्याला पकडण्याचा प्रयत्न आमच्या वनकर्मचाऱ्यांनी त्यावेळी केला नाही. आता पुन्हा पिंजरा लावून बिबट्यास जेरबंद करण्यासाठी नियोजन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. एवढे होईपर्यंत दिवस उजाडला होता. गावातील लोकांनी बिबट्याच्या शिकारीचा थरार प्रत्यक्ष पाहिल्याच्या गप्पा गावात रंगल्या होत्या.

बातम्या आणखी आहेत...