आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:भाजप नगरसेविकेच्या पतीने कोविड सेंटरच्या गेटवरच धडकवली कार, कोविडग्रस्त हल्ल्याने भेदरले

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 25 दिवसांपूर्वी वडिलांचा येथेच मृत्यू झाल्याने नैराश्यातून कृत्य

रुग्णसेवा सुरळीत सुरू हाेती, रुग्णांचे नातेवाइक रुग्णांसाठी डबेही घेऊन येत हाेते, सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांची जेवण देण्याची लगबग चालली हाेती. सुरक्षारक्षकही कर्तव्यावर हाेते. सगळं काही व्यवस्थित सुरू असतानाच अचानक एक इनाेव्हा थेट प्रवेशद्वारातून काचा फाेडून अात घुसली, त्यातून काहीजण उतरत सरळ कर्मचाऱ्यांच्या दिशेने दगडफेक अन‌् शिवीगाळ करू लागले, क्षणार्धात धावाधाव झाली, भीती पसरली, दहशत पसरली. समाेर हाेता गुन्हेगार राजेंद्र (कन्नू) ताजणे. भाजपच्या नगरसेविका सीमा ताजणे यांचा हा पती. त्याने यापूर्वीही असेच कृत्य केलेले अाहे. त्याच्या या कृत्यामुळे रुग्ण, नातलग आणि कर्मचाऱ्यांमध्ये एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे या हल्ल्याची दहशत निर्माण झाली होती.नाशिकराेडमधील महापालिकेच्या काेविड केअर सेंटरमध्ये शनिवारी (दि. १५) सायंकाळी साडेसात वाजता घडलेला हा प्रकार. कन्नू ताजणेने गाडी अात घुसवत जाे धुडगूस घातला यामुळे रुग्णालयातील परिचारिका घाबरल्या हाेत्या तर डाॅ. जितेंद्र धनेश्वर यांनी घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली. रुग्णालयात बाहेरील नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिस निरिक्षक सूरज बिजली यांनी गर्दी हटविल्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली होती.

रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम : महापौर सतीश कुलकर्णी, वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, विभागीय अधिकारी संजय गोसावी यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. तर पोलिस उपायुक्त विजय खरात आणि सहायक पोलिस आयुक्त समीर शेख यांनी कन्नू ताजणे याला ताब्यात घेण्यासाठी तपासाला वेग दिला. रात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी ताजणेला ताब्यात घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली होती.

यामुळे कृत्य केल्याची चर्चारुग्णालय तोडफोड करणाऱ्या राजेंद्र (कन्नू) ताजणे याचे वडील काशीनाथ ताजणे हे पोलिस कर्मचारी होते. वारकरी असल्याने धार्मिक कार्यक्रमांमध्ये त्यांचा नेहमी सहभाग असायचा. पंचवीस दिवसांपूर्वी नाशिकराेडच्या याच काेविड सेंटरमध्ये काशीनाथ ताजणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हाेता. वडिलांच्या मृत्यूची सल मनात ठेवत कन्नू ताजणेने हे कृत्य केल्याची चर्चा रुग्णालयात हाेती.

गुन्हेगारी पार्श्वभूमी : विभागीय कार्यालयाच्याही फोडल्या होत्या काचा, अनेक गुन्हे दाखलनाशिकरोड येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयाच्या उद‌्घाटनाच्या पूर्वरात्री प्रवेशद्वाराच्या काचा कन्नू ताजणे याने फोडल्या होत्या. पुन्हा तसाच प्रकार केल्याने नाशिकराेड परिसरात प्रचंड संताप व्यक्त हाेत अाहे. कन्नू ताजणेवर अनेक गुन्हे दाखल असून त्याला तडीपारदेखील करण्यात आले होते.काच फुटण्याचा प्रचंड आवाज; कोरोना रुग्ण थेट वार्डातून खाली येत मिसळले गर्दीतकन्नू ताजणेने रुग्णालयाचे काचेचे प्रवेशद्वार फोडत गाडी अात बेदरकारपणे घुसवल्याने काच फुटून त्याचा प्रचंड आवाज झाला. तो एवढा तीव्र होता की, तिसऱ्या मजल्यावरील रुग्ण काय घडले म्हणून बघायला थेट खाली आले होते. रुग्ण, नातलग आणि वैद्यकीय कर्मचारी यांच्यामध्ये भीती पसरली हाेती. काच फुटल्यानंतर सेंटरच्या संपूर्ण परिसरात फुटलेल्या काचांचा खच निर्माण झाला हाेता. सुदैवाने त्यावेळी या ठिकाणी कोणीही व्यक्ती उपस्थित नव्हते. अनेक तरुणांनी या घटनेचे चित्रीकरण करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याने घटनेचे वृत्त वाऱ्यासारखे पसरले. त्यामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली हाेती. यावेळी कोरोनाबाधित रुग्ण हे गर्दीमध्ये मिसळल्याने नंतर संसर्गाबाबतही भीती निर्माण झाली अाहे. नाशिकरोड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी काचा पडलेल्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून रुग्ण व नातलगांना येण्या-जाण्यासाठी बंदी केली होती. मात्र, यावेळी रुग्णांमध्ये प्रचंड भीती पसरली होती, तर कर्मचाऱ्यांमध्ये संताप होता.

राजकीय घडामोडींना येणार वेग

महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता असून सत्ताधारी पक्षाच्या नगरसेविकेच्या पतीने अशा सार्वजनिक वास्तूचे नुकसान करून आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे सत्ताधारी पार्टीचे काम योग्यरितीने होत नसल्याचा घरचा आहेर दिला. या घटनेची राज्यस्तरावर त्वरित दखल घेतली गेल्याने भविष्यात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता आहे.

यापूर्वीच्या पाच घटना, रुग्णालय अन‌् डॉक्टरांना केले लक्ष्य

मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील दाेन रुग्णालयांत तोडफोड करण्याची घटना.

सातपूरला रुग्ण दगावल्याने दोन डाॅक्टरांना मारहाणीची घटना.

इंदिरानगरमध्ये रुग्णाला घरी उपचार देण्यास नकार देणाऱ्या डाॅक्टरला मारहाण करण्याची घटना घडली.

एका स्थानिक वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने कोविड रुग्णालयात बळजबरीने घुसत डाॅक्टरांना शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना घडली.

अशा पाच घटनांमध्ये रुग्णालय अाणि डाॅक्टरांना लक्ष्य करत मारहाण अाणि तोडफोड करण्याचे प्रकार घडले.

बातम्या आणखी आहेत...