आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:नाटकातील जिवंत अनुभव नट नव्हे तर नाटककारच निर्माण करतो : डॉ. पटेल, नाट्य परिषदेतर्फे पद्मश्री डॉ. मोहन आगाशे, संजय पवार, गिरीश सहदेव व शहरातील रंगकर्मींना

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोपर्यंत नाटककार नाटक लिहीत नाही तोपर्यंत त्यासंदर्भातील इतर लोक काही काहीच करू शकत नाही. नाटकातील जाे जिवंत अनुभव असतो तो नट नाही तर नाटककार निर्माण करतो. त्यामुळे नाटक हे नाटककाराचेच असते, असा संवाद पद्मश्री डॉ. जब्बार पटेल यांनी साधला.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेच्या वतीने महाकवी कालिदास कलामंदिरात गुरुवारी (दि. १२) झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. पटेल बोलत होते. लेखक संजय पवार यांना यावेळी वि. वा. शिरवाडकर लेखन पुरस्कार, पद्मश्री डॉ. मोहन आगाशे यांनी प्रा. वसंत कानेटकर रंगकर्मी पुरस्कार आणि बाबूराव सावंत नाट्यकर्मी पुरस्कार प्रा. गिरीश सहदेव यांना पालकमंत्री छगन भुजबळ आणि डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

पटेल म्हणाले की, रंगभूमीची जडण-घडण ही हळूहळू होत असते. करूया चळवळ असं म्हटलं की लगेच चळवळ होत नसते. प्रत्येक क्षेत्रात जगाचा एक वेग आहे. अनेक विषयांत कायदे, नियम असतात तरी माणसातील दुरावा काही जात नाही. कारण वेळ जावा लागतो. कोणतीही राजवट कोणी आणत नाही तर ती येऊन आदळते. आता बरं चाललंय असं आपण म्हणतो तोपर्यंत वेगळंच काहीतरी घडतं. मग ते घडणं किती मागे वा पुढे नेतं हे सांगता येत नाही. त्यातही आपण आपले मुद्दे मांडतो पण त्यामागे यंत्रणा हवी. समाजात हळूहळू बदल होत असतात. रंगभूमीचा प्रेक्षकही कधीही नकारार्थी नसतो. नाटककार तेंडुलकर, कानेटकर, शिरवाडकर व्हायलाही एक काळ जायला लागलाच आहे. त्यामुळे स्थित्यंतरं लक्षात घ्यायला हवी. सगळ्यात मागासलेला भाग म्हणजे नाटक आहे. कारण त्यात चकचकीतपणा नसून वास्तव असतं. जे जिवंत करायचं असतं ते नाटक आणि त्यासाठीच खूप थोडे लोक पुढे येतात. पण, त्यातही जे मनापासून करावंसं वाटतं तेव्हाच नाटक करावं, असं माझं मत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

भुजबळ म्हणाले की, मंचावर डॉ. पटेल हे बालरोगतज्ज्ञ तर डॉ. आगाशे हे मानसरोगतज्ज्ञ आहेत. आम्ही राजकारणी लोक त्यांना अनेक विषय देतो. आमच्या बालिशपणावर डॉ. पटेल औषध देऊ शकतात तर टीव्हीवर तेच तेच पाहून डोकं जे हलतं त्यावर डॉ. आगाशे औषध देऊ शकतात. यावर सभागृहात एकच हशा पिकला. रंगकर्मी पुरस्कारार्थींच्या वतीने दत्ता पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी बागेश्री वाद्यवृंदाने नांदी सादर केली. यावेळी व्यासपीठावर परिषदेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे उपस्थित होते. मिलिंद गांधी यांनी सन्मानपत्राचे वाचन केले. सुनेत्रा मांडवगणे यांनी सूत्रसंचालन केले.

बातम्या आणखी आहेत...