आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दाणादाण:पहिल्याच पावसात ‘स्मार्ट’च्या कामांची दैना ; नागरिक त्रस्त

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेसह स्मार्ट सिटीने केलेल्या कामांचे पितळ बुधवारी (दि. २२) शहरात बरसलेल्या पहिल्याच पावसाने उघडे पडले. या पावसाने भूमिगत गटारीत पाणी तुंबल्याने मेनरोड, दहिपूल, अशाेकस्तंभ, गंगापूररोड परिसरात मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी साचले हाेते. बाजारपेठेतील दुकानांमध्ये तसेच अनेक घरांमध्ये पाणी शिरले. यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

शहरात पालिका व स्मार्ट सिटीच्या वतीने भूमिगत गटारीचे काम करण्यासाठी खोदकाम करण्यात आले होते. तसेच त्र्यंबकरोड ते अशाेकस्तंभ परिसरात तब्बल २४ कोटी रुपये खर्च करत स्मार्ट रोडदेखील साकारण्यात आला. मात्र, बुधवारी पडलेल्या पहिल्याच पावसाळ्यात या स्मार्ट रोडवरील ड्रेनेज ओव्हरफ्लो झाल्याने रस्त्यावर पाणी वाहत असल्याची परिस्थिती बघावयास मिळत होती.

अशीच काहीशी परिस्थिती दहिपूल, हुंडीवाला लेन, सराफ बाजार परिसरातदेखील निर्माण झाली होती. पावसाच्या पाण्याचा निचराच हाेत नसल्याने या परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानदारांना साहित्य सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा. पहिल्याच पावसात शहरात अशाप्रकारे ठिकठिकाणी पाणी साचून तळे बनल्याने पालिकेच्या कारभारावर नागरिकांकडून चांगलाच संताप व्यक्त केला जात आहे.शहरातील मुख्य बाजारपेठ समजल्या जाणाऱ्या दहिपूल, मेनरोड परिसरासह अशोकस्तंभ परिसरात पावसाचे पाणी साचत असल्याने नागरिकांना बुधवारी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. असे प्रकार पुन्हा होऊ नये यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्मार्ट सिटीसह पालिकेविरोधात व्यापाऱ्यांचा वाढता रोष स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहरात ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आलेले आहे. यामुळे व्यापाऱ्यांसह नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मात्र, पावसाळ्याच्या सुरुवातीला शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने स्मार्ट सिटीने नेमके कोणते काम केले, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी काय उपाययोजना केल्या असे प्रश्न उपस्थित केले जात आहे. तर दुसरीकडे पालिकेच्या वतीनेदेखील पावसाळापूर्व कोणतेही काम न केल्याने अशी परिस्थिती उद‌्भवली असल्याने पालिका आयुक्त तथा प्रशासकांनी या प्रकाराकडे गंभीरपणे लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.