आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनाेखा लढा:अवघ्या 5 दिवसांच्या कोरोना पॉझिटिव्ह तान्ह्या बाळाची आईशी झाली ताटातूट

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • रुग्णालयातील ‘सिस्टर’च बजावत आहेत बाळाच्या ‘मदर’ची भूमिका

अशोक गवळी 

कोरोनाच्या धसक्याने सारे जग हतबल झाले असताना आणि भले भले त्यामुुळे भयभीत झाले असताना कोरोनासोबतच जन्मलेले एक बाळ नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांच्या सुरक्षा कवचात कोरोनाशी शर्थीने झुंजत आहे. विशेष म्हणजे बाळ कोरोना पॉझिटिव्ह, तर आई निगेटिव्ह असल्याने सध्या दोघांची ताटातूट झाली असून जिल्हा रुग्णालयातील ‘सिस्टर’च तूर्त या बाळाच्या ‘मदर’ची भूमिकाही तेवढ्याच ममतेने पार पाडत आहेत. 

जिल्हा रुग्णालयात विंचूर परिसरातील एक महिला ४ मे रोजी बाळंतपणासाठी दाखल झाली. कोरोना चाचणीसाठी या महिलेचे नमुने पाठविण्यात आले. पण, त्याचा निकाल येण्याअगोदर दुसऱ्याच दिवशी ५ मे रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास महिला प्रसूत झाली. एक छान हसरा मुलगा जन्माला आला. खबरदारीचा उपाय म्हणून लगेच बाळाचेही नमुने कोरोना चाचणीसाठी पाठविण्यात आले. प्रथम आईच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने यंत्रणा सुटकेचा नि:श्वास टाकत नाही तोच दुर्दैवाने ११ मे रोजी बाळाचा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला. ते पाहताच रुग्णालय प्रशानसनाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना  योजल्या व अवघ्या पाच दिवसांच्या या बाळाला एका स्वतंत्र खोलीत ठेवण्यात आले. मातेची आणि बाळाची झालेली ही ताटातूट सुरुवातीला तेथील सगळ्यांचेच काळीज पिळवटून टाकत होती. पण, रुग्णालयाचे डॉक्टर तसेच परिचारिका यांनी बाळाच्या पालकांना धीर दिला. बाळाची खबरदारी अगदी घरच्यासारखी घेतली जाईल असा शब्दही दिला. त्यानुसार सेवेत असलेल्या परिचारिकाच बाळाच्या आईची भूमिका बजावत आहेत. पीपीई किट आणि अन्य आवश्यक ती खबरदारी घेऊन या बाळाला त्याच्या आईचेच दूध दिले जात आहे. पण, अंगावर न पाजता त्याला ते बाहेरून दिले जात आहे. शिवाय, बाळाला आवश्यक ते औषधपाणी करणे, वेळोवेळी त्याच्या तपासण्या करणे, स्वच्छता करणे, रडायला लागल्यावर त्याला थोपटणे अशी बाळाची सर्वतोपरी काळजी आम्ही अहोरात्र घेत असल्याचे संबंधित परिचारिकेने सांगितले.  

लहान बाळांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने त्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असून सध्या ते सुखरूप आहे. गेल्या पाच दिवसांपासून बाळाचे कोरोनाशी सुरू असलेले द्वंद्व यशस्वी होईल  आणि  १४ दिवसांच्या कालावधीनंतर परत केली जाणारी चाचणी निगेटिव्ह येऊन लवकरच ते पुन्हा आपल्या आईच्या कुशीत विसावेल असा विश्वास रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना यावेळी व्यक्त केला.

मातेला व्हिडिओ कॉलिंगचा आधार

तान्हुल्याला कुशीत घेता येत नसल्यामुळे आईची कमालीची घालमेल सुरू आहे. दिवसातून काहीच क्षण तिला खोलीच्या खिडकीतून बाळाला बघता येते. पण, त्यामुळे समाधान होत नाही.,म्हणून सिस्टर जेव्हा बाळाजवळ असतील तेव्हा मधूनच एखादेवेळी व्हिडिओ कॉलिंगच्या माध्यमातून तिला बाळाचे ‘क्लोजअप’ डोळे भरून न्याहाळता येतात. तूर्त त्यावरच भागवावे लागत असले मी तरी कधी एकदा बाळाला छातीशी कवटाळते असे त्या मातेला झाले आहे.

अनोख्या लढ्याचे चित्रण 

दिव्य मराठीचे छायाचित्रकार अशोक गवळी यांनी रुग्णालय प्रशासनाशी संपर्क साधून त्यांच्या परवानगीने पीपीई किटसह आवश्यक त्या सुरक्षेच्या साधनांसह बाळाला ज्या कक्षात ठेवले आहे तिथे जाऊन या अत्यंत भावनिक अशा प्रसंगाचे चित्रण केले. नवजात बाळाची कोरोनाशी सुरू असलेली झुंज, त्याच्या आईची, कुटुंबीयांंची धडपड आणि रुग्णालयाचे डॉक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांकडून सुरू असलेली प्रयत्नांची पराकाष्ठा वाचकांसमोर आणावी एवढाच उद्देश त्यामागे होता.

बाळाच्या प्रकृतीत हाेतेय सुधारणा

नवजात अर्भकासाठी आईचे दूधच सर्वोत्तम असते. त्यानुसार पहिले चार दिवस बाळाला आईचे दूध थेट मिळाले, पण अहवाल पॉझिटिव्ह आला आणि सगळेच बदलले. सध्या बाळाला त्याच्या आईचेच दूध दिले जात आहे, पण ते थेट देण्याऐवजी बाहेरून दिले जात आहे. या शिवाय, मल्टिव्हिटॅमिन सिरप आणि अन्य औषधेही बाळाला दिली जात असून बाळाची प्रकृती सुधारत आहे. १४ दिवसांनंतरची त्याची चाचणी निगेटिव्ह येईल असा आम्हाला विश्वास आहे. - सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

बातम्या आणखी आहेत...