आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएमएसएमई योजनेच्या मदतीने भारत सरकार छोट्या उद्योगांना आर्थिक सहाय्य देते. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विकास कायद्यांतर्गत ही योजना तयार करण्यात आली आहे. देशातील लहान आणि मध्यम उद्योगांना विकसित करण्यासाठी व आवश्यकतेनुसार मदत उपलब्ध करून देण्याचे कार्य ही योजना करते.‘मेक इन इंडिया’ व ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनेचे खरे चित्र आज भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाला दाखवून दिले आहे. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देणारी ही योजना आहे व उद्योजकांसाठी मोठी संधीही असल्याचे प्रतिपादन भारत सरकारच्या एमएसएमईबोर्डाचे सदस्य प्रदीप पेशकार यांनी केले.
टॅक्स प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने उद्योजकांसाठी आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन करताना पेशकार बोलत होते. व्यासपीठावर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र बकरे व पदाधिकारी होते. केंद्र सरकारच्या या योजनांद्वारे उद्योजकांना कमी व्याजदराने कर्ज मिळण्यास तसेच सरकारी टेंडर्स मिळण्यास मदत होते. सरकारी परवाने, मंजुरी मिळवणे सोपे होते. प्रत्यक्ष कर कायद्यांतर्गत सूट मिळते.
याचबरोबर महिला उद्योजकांसाठी काही विशेष योजना आहेत या योजनांचा लाभ अधिकाधिक व्यावसायिकांनी घ्यावा, असे आवाहन पेशकार यांनी यावेळी केले. करसल्लागार हे व्यावसायिक उद्योजकांना वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. त्यांच्या आर्थिक नोंदींची माहिती घेऊन करभरणा करत असतात. यामुळे ते एकप्रकारे राष्ट्रनिर्मितीच्या कार्यातील घटक असल्याची जाणीव करून देऊन, उद्योजकांना व्यवसाय सुरू करण्यासाठी तसेच विस्तारीकरणासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यामध्ये आपलेसुद्धा भरीव योगदान असले पाहिजे.
केवळ जिल्हा उद्योग केंद्रावरच अवलंबून न राहता उद्योग-व्यवसायासाठी केंद्र सरकार व काही प्रमाणात राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा. आपण आपल्या कार्याची सीमा वाढवली पाहिजे. कर सल्लागार म्हणून काम करत असताना आपण औद्योगिक धोरणाचा अभ्यास केला पाहिजे, विविध प्राधिकरणांच्या, बँकांच्या अधिकाऱ्यांशी आपले संबंध प्रस्थापित केले पाहिजे याकडे पेशकार यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. सूत्रसंचालन प्रकाश विसपुते यांनी केले व आभार प्रदर्शन रूपाली तिवारी यांनी केले. कार्यशाळेच्या आयोजनाकरिता अक्षय सोनजे, नितीन डोंगरे, मनोज धाडिवाल, प्रकाश विसपुते, योगेश कातकाडे, अनिकेत कुलकर्णी, संदीप गाढवे आदींनी परिश्रम घेतले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.