आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरड दुर्घटना:पश्चिम घाटात स्वतंत्र पर्जन्यमापन यंत्रणेची गरज

नाशिक / किशोर वाघ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या काही वर्षांपासून राज्यातील घाटांत विशेषत: सह्याद्रीच्या पश्चिम घाट परिक्षेत्रात सातत्याने दरडी कोसळत आहेत. घाटक्षेत्र बहुदा जिल्ह्यांच्या सीमांमध्ये विभागले जात असल्याने पाऊसही त्या-त्या जिल्ह्यातच मोजला जातो. त्यामुळे नेमका पाऊस कुठे व किती पडतो याच्या अचूक माहितीसाठी घाट क्षेत्रातच शास्त्रोक्त उपाययोजनांबरोबरच स्वतंत्र पर्जन्यमापनाची यंत्रणा व प्रभावी व्यवस्थापनाची नितांत आवश्यकता या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली.

कोकणात तळियेेत अख्खी वाडीच ढिगाऱ्याखाली गाडली गेली. नाशिक, ठाण्याच्या सीमेवरील तसेच दिल्ली-मुंबई अर्थात पश्चिम-उत्तर भारताला जोडणाऱ्या कसारा घाटातही गत पंधरा दिवसांत १० ठिकाणी दरडी कोसळल्या. गतवर्षीही येथे १२ ठिकाणी दरड कोसळण्यासह रस्ता खचला होता. पश्चिम घाट क्षेत्रासह सर्वच घाट क्षेत्रांत दरवर्षी वन विभाग हद्दीत हे प्रकार घडत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजनांची आवश्यकता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणासह तज्ज्ञांनीही व्यक्त केली आहे. कसाऱ्यातील घटनांबाबत प्राधिकरणाने तसे वन विभागाला पत्र लिहून कळवलेही आहे.

कसारा घाटात स्वतंत्र पर्जन्यमापन केंद्र
कसारा घाटात सध्या सरासरीपेक्षा अधिक पाऊस आहे. जास्त दिवसांत पडणारा पाऊस आता कमी दिवसांत पडत असल्याने माती, खडक, दगडांची झीज होते. पण त्याचे अचूक मोजमाप होत नाही. कारण कसारा घाटातील पाऊस हा शहापूर मंडळातील पर्जन्यमापन केंद्रावर ठरतो. कसारा घाटात पर्जन्यमापन केंद्र पाहिजे. तसे कळवले आहे. : दिलीप पाटील,राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे व्यवस्थापक

दिव्य मराठी एक्स्पर्ट : पाऊस, माती, दगडांचा अभ्यास महत्त्वाचा
पावसाचे प्रमाण मोजण्यासाठी नेटवर्कची गरज आहे. पर्जन्यमापन व्यवस्था हवीच. त्यामुळे अचूक माहिती हातात येईल. पावसाच्या प्रमाणावरून उपाययोजना ठरवता येतील व त्या पावसाआधीच व्हायला हव्यात. घाट मार्ग तयार करताना खोदलेल्या भागातील माती, खडकांच्या भेगांत पाणी जाऊन तो जड होतो व दरडी कोसळतात. त्यामुळे परिसरातील पाऊस , माती, दगड व खडकांचा अभ्यास करूनच उपाययोजना कराव्या लागतील. तेव्हाच घाट मार्ग चिरकाल सुरक्षित राहू शकतील. - डाॅ. सतीश ठिगळे, भूशास्त्र अभ्यासक

कसाऱ्याचा पाऊस शहापूर मंडळाच्या सरासरीवर
कसाऱ्यासह पश्चिम घाटात बहुतांश परिसरात पर्जन्यमापनाची स्वतंत्र व्यवस्था नाही. संबंधित घाट परिक्षेत्र येत असलेल्या संपूर्ण मंडळातील पावसाची नोंद ही त्या घाटावरील पावसाचे प्रमाण ठरवते. जसे की, कसारा घाट व इगतपुरी परिसरात सर्वाधिक पाऊस पडतो. पण कसारा घाटातील पाऊस हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर मंडळातील सरासरी पावसावर ठरतो. पण लगतच्या नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्याच्या सरासरीची कुठेही दखल व नोंद घेतली जात नाही. त्यामुळे अचूक उपाययोजना करण्यात अडचणी येतात.

बातम्या आणखी आहेत...