आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:कोरोनापश्चात फुप्फुसांचा संसर्ग होणाऱ्या रुग्णांत 16 पट वाढ, रुग्णसंख्या 3 वर्षांत 86,307 वर

नाशिक | दीप्ती राऊत15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाने रुग्णांच्या शरीरात सर्वात मोठा आघात केला तो फुप्फुसांवर. त्यामुळे कोविड झालेल्या रुग्णांमध्ये फुप्फुसाच्या विकारांमध्ये तब्बल सोळापट वाढ झाल्याचे गेेल्या ३ वर्षांतील आकडेवारीतून पुढे आले आहे. महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत सन २०१९ पर्यंत फुप्फुसावरील उपचारांसाठी दाखल झालेल्या ५,३०६ रुग्णांच्या तुलनेत सन २०२२ मध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या सोळापटीने वाढून ८६,३०७ वर पोहोचली आहे.

कोरोना संसर्गातून बऱ्या झालेल्या रुग्णांना रक्तात गुठळ्या होण्याची व्याधी होत असल्याची अनेक उदाहरणे पुढे येत आहेत. दरम्यान, फुप्फुसाच्या आजारांचे प्रमाणही वाढल्याचे या आकडेवारीतून सिद्ध होत आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग श्वसन मार्गावाटे फुप्फुसांत झाल्याने रुग्णाच्या फुफ्फुसाचा काही भाग टणक होऊन त्यांची क्षमता घटल्याचे निदान होत होते. नंतरच्या काळात कोरोना संसर्गातून रुग्ण बरा झाला असला तरी त्यांच्या फुप्फुसांची ती अवस्था पूर्ववत झालेली दिसून येत नसल्याचे डॉक्टरांचे निरीक्षण आहे. रुग्णांनाही काही महिन्यांनी धाप लागणे, थकवा जाणवणे ही लक्षणे कायम राहिल्याचे दिसत असल्याने त्यांच्या तपासण्यांमधून फुप्फुसाची क्षमता कमी झाल्याचे व त्यांच्या संसर्गांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.

३ वर्षांत रुग्णसंख्या वाढली
शासकीय व खासगी आरोग्य सेवेत उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या संकलित होत नाही. यामुळे कोविड पश्चात होणाऱ्या व्याधींची एकत्रित आकडेवारी नसते. महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत लाभार्थी रुग्णांवरील उपचारांची माहिती संकलित होत आहे. यामुळे त्यांचे तुलनात्मक प्रमाण मोजणे शक्य आहे. यात फुफ्फुसाचा संसर्ग व त्यावरील उपचारांच्या संख्येत गेल्या तीन वर्षांत कमालीची वाढ झाल्याचे दिसते.

कोविडकाळात रुग्णसंख्या ६३,२५८ वर
२०१९-२० मध्ये जन आरोग्य योजनेअंतर्गत ५,३०६ रुग्णांनी फुप्फुसांच्या संसर्गासाठी उपचार घेतले. त्यासाठी १२ कोटींचा निधी दिला गेला. २०२०-२१ मध्ये हे प्रमाण ६३,२५८ रुग्णसंख्येवर गेले. त्यानंतर २०२१-२२ मध्ये या रुग्णांची संख्या वाढून थेट ८६,३०७ वर पोहोचली. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत या योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या व नोंदल्या जाणऱ्या रुग्णांची संख्या मर्यादित असली तरी फुप्फुसांचा संसर्ग वाढत असल्याचे सिद्ध करण्यासाठी या नोंदी नमुन्यादाखल बोलक्या ठरत आहेत.

सन रुग्णसंख्या उपचारावर खर्च
2019-20 5,306 12 कोटी
2020-21 63,258 57 कोटी
2021-22 86,307 140 कोटी

योजनेेतून दिल्या जाणाऱ्या निधीतही सातत्याने वाढ होत असताना दिसत आहे. (संदर्भ - महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना)

फुप्फुसांवर परिणाम
^अनेक दिवस बरा न होणारा खोकला किंवा कफाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसते. तत्कालीन संसर्गासोबतच त्यांची हिस्ट्री घेताना त्यांना पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेत कोरोना झाल्याची नोंद दिसून येत आहेत. त्या वेळी ज्यांच्या फुफ्फुसांचा प्टिफनेस वाढला होता, त्यांच्यात हे विकार दिसून येत आहेत. परिणामी अन्य संसर्गही होत आहेत. त्यांची गॅस एक्स्चेंजची क्षमता खालावलेली दिसून येत आहे.'
- डॉ. अतुल वडगावकर, एमडी

बातम्या आणखी आहेत...