आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावीज ग्राहकांच्या विविध तक्रारींची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने नियम केले आहेत. त्यासाठी ग्राहक गाऱ्हाणे मंच नावाची यंत्रणादेखील उभी केली आहे. मात्र नाशिकमध्ये डिसेंबर २०२० पासून या मंचाचे अध्यक्ष व सदस्य पदे रिक्त आहेत. यामुळे मंचाचे कामकाज ठप्प असून ग्राहकांच्या शेकडो तक्रारींचे पुढे काहीच होत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत.
या ग्राहक गाऱ्हाणे मंचावर अध्यक्ष म्हणून निवृत्त न्यायाधीश अथवा जिल्हाधिकारी किंवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य असतात. अन्य दोन सदस्यांत एक ग्राहक प्रतिनिधी व एक वीज वितरण कंपनी प्रतिनिधी यांचा समावेश असताे. नवीन जोडणी देणे, पूर्वसूचनेशिवाय ग्राहकाची वीज कापली जाणे, वाढीव वीजबिलाच्या तक्रारींचा निपटारा न होणे या आणि अशा अनेक प्रकारच्या तक्रारी या गाऱ्हाणे मंचात येतात. त्यामुळे हा मंच महत्त्वाचा आहे. मध्यंतरी मंचाचे अध्यक्ष वीज वितरण कंपनीचे सेवानिवृत्त अभियंता असावा असा काहीसा बदल सुचविला गेला होता, मात्र तसे झाल्यास ग्राहकांना निष्पक्ष न्याय मिळणार नाही अशी भावना व्यक्त होत त्याला प्रचंड विराेध झाला.
अडीच वर्षांत सर्वाधिक तक्रारी ओबडसमनकडे
मंचाकडून माहिती घेतली असता सध्या मंच कार्यरत नसल्याने तक्रारी थेट ओबडसमनकडे निकालासाठी जातात. त्यांच्याकडे सध्या केवळ तीस ते पस्तीस तक्रारी यामुळे प्रलंबित असल्याचे चित्र दिसते. सर्वाधिक तक्रारी ज्यादा वीजबिल आकारल्याच्या आहेत हे विशेष.
सहा महिन्यांत पद भरणे बंधनकारक
ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंचचे अध्यक्ष अथवा सदस्य यांचे पद रिक्त झाल्यानंतर ते सहा महिन्यांच्या आत भरणे बंधनकारक आहे. मात्र, नाशिकमध्ये डिसेंबर २०२० म्हणजे तब्बल दीड वर्ष ही पदे रिक्त आहेत. आयोगाने या पदांकरिता मुलाखती घेऊन एक वर्ष झाले तरी नियुक्ती जाहीर केलेली नाही. वीज वितरण कंपनीचे सदस्य कार्यरत आहेत पण ग्राहक प्रतिनिधीची नियुक्ती नाही. नियमानुसार मंचाच्या तीनपैकी किमान दोन सदस्य असल्याशिवाय हा मंच काम करू शकत नाही. त्यामुळे तक्रारीसाठी ओबडसमनकडे जावे लागत आहे.
सर्व कायद्याच्या विरोधात, ग्राहकांची थट्टा
अडीच-अडीच वर्षे पद रिक्त राहणे हे सरळ सरळ आयोगाच्या नियमांच्या विरोधात आहे. केवळ महावितरण स्वतःचे हित पहात असून ग्राहकांना वाऱ्यावर सोडले असल्याची परिस्थिती आहे. मंचावर नियुक्त्या करतानाही स्वतःचेच अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी कसे बसतील याचे जाणीवपूर्वक प्रयत्न करायचे हेदेखील ग्राहकांच्या हिताला मारक आहे.
- प्रताप होगाडे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वीज ग्राहक संघटना
तातडीने नेमणूक करावी
ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यांना न्याय मिळावा याकरिता ग्राहक गाऱ्हाणे निवारण मंच हा एकमेव पर्याय असून या मंचाचे अध्यक्ष व सदस्य यांची पदे रिक्त राहणे योग्य नाही. मात्र केवळ महावितरणच्या अधिकाऱ्यांचीच यावर नियुक्ती व्हावी या उद्देशाने ही नेमणूक रखडलेली असल्याचे म्हणावे लागेल. कारण, मुलाखती होऊनही प्रश्न कायम आहे.
- अॅड. सिद्धार्थ वर्मा, वीज ग्राहक संघटना
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.