आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबदलत्या जीवनशैलीने भारतातील गर्भवती महिलांमधील मधुमेहाचे वाढते प्रमाण अधिक चिंताजनक ठरत आहे. भारतात २० टक्के गर्भवती महिलांमध्ये मधुमेह हा गर्भधारणेतील गुंतागुंतीचे मुख्य कारण ठरत आहे. त्यामुळे मधुमेह विशेषतः महिलांसाठी धोकादायक आहे, कारण त्याचा परिणाम महिलांच्या आरोग्यावर होतो. हृदयविकार, मूत्रपिंडाचे आजार, अंधत्व, नैराश्य, मूत्रमार्गाचे संक्रमण (यूटीआय) या आजारांसह गर्भपात होण्याचा धोका संभावतो.
त्यामुळे मधुमेह असलेल्या गर्भवती महिलांनी डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसारच आैषधे घ्यावीत. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे आणि संतुलित आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला आंतरराष्ट्रीय मधुमेहतज्ज्ञ असाेसिएशनचे अध्यक्ष पद्मश्री डाॅ. शशांक जाेशी यांनी दिला. नाशिकमध्ये मधुमेहतज्ञांच्या परिषदेसाठी आलेल्या डाॅ. जाेशी यांनी दिव्य मराठीशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, गर्भारपणात महिलांना खूप खाण्याचा व खूप विश्रांतीचा आग्रह धरू नये. ग्रामीण आणि शहरी भागात मधुमेहाचे प्रमाण वाढत आहे. यामागे केवळ जीवनशैली हेच मूळ कारण असले तरी त्याचबराबेर अनुवांशिकता हे एक कारण आहे. आई वडिलांना मधुमेह असेल तर ९० टक्के मुलांना त्याची लागण हाेते. आई किंवा वडिल दाेघांपैकी एकाला असल्यास अशा कुटुंबियात ७० टक्के आणि नातलगांना असल्यास अशांना ४० टक्के मधुमेहाची लागण हाेण्याची शक्यता असते. जीवनशैलीतील बदल म्हणजे सद्याच्या काळात जीवन जगणे अधिक सुकर झाले आहे.
पुर्वीच्या काळात शेतकरी शेतात काम करायचे तर महिला घरी दळण दळण्यासारखे कामे करायचे. मात्र सद्यस्थितीत इलेक्ट्राॅनिक तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे माेबाईल, लॅपटाॅपसारख्या उपकरणांमुळे प्रत्येक व्यक्तीचे शारीरीक श्रम कमी झाले आहे. सुस्त आणि मस्त झालाे आहाेत. शारीरीक हालचाली कमी झाल्याने आणि आहारात देखील प्राेटीनची कमतरता असल्याने पाेटाचा घेर वाढताेय. पाेटाच्या चरबीमुळे चार आजार उदभवतात.
मधुमेह, रक्तदाब, काेलेस्ट्रालची समस्या, हदयविकारचा धाेका अधिक असताे. पुरूषांमध्ये ९० सेमीपेक्षा जास्त आणि महिलांमध्ये ८० सेमी पेक्षा जास्त पाेटाचा घेर असल्यास त्याने नियमित तपासण्या केल्या पाहिजेत. युवा पिढीमध्ये मधुमेहाचे प्रमाण दहा वर्षांपूर्वी २ ते ५ टक्के हाेते. तेच आता १२ ते १५ टक्क्यांवर पाेहचले आहे. ताणतणाव, स्पर्धा, जंकफूड, धूम्रपान हे कारणीभूत आहे.
भारत ही मधुमेहाची काळजी घेणारा देश ठरेल
टाइप वनचा मधुमेह भारतात सर्वात जास्त आहे. भारत हा मधुमेह रुग्णांची सर्वाधिक संख्या असणारा म्हणजेच मधुमेहाची राजधानी ठरणार नाही तर काळजी घेणारा देश म्हणून त्याची ओळख निर्माण करण्याचा मधुमेह तज्ज्ञांच्या परिषदेचा प्रयत्न आहे. नागरिकांनी जागरूक राहिल्यास मधुमेह नियंत्रित राहू शकतो. - डॉ. शशांक जोशी, अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय मधुमेहतज्ञ असाेसिएशन
चीननंतर भारतात सर्वाधिक रुग्ण
मधुमेहाचे प्रमाण टाइप वन आणि टाइप टू अशा दाेन प्रकाराचा मधुमेह असतो. भारत हा देश दुसऱ्या क्रमांकावर असून पहिला क्रमांक चीनचा लागताे. महाराष्ट्रात टाइप वनचा प्रकार वाढत आहे. यात कायमस्वरूपी इन्सुलीन द्यावे लागते. हा लहान मुलांना देखील हाेताे. आपल्या शरीरात पांढऱ्या पेशीमधून अॅण्टीबाॅडी तयार हाेतात.
"एबीसीडीईएफ''चा आरोग्यदायी मंत्र
ए -म्हणजे अॅव्हरेज साखर ६० टक्क्यांपेक्षा खाली ठेवा, बी- म्हणजे ब्लडप्रेशर १३० ते ८० च्या खाली ठेवावे, सी- म्हणजे एलडीएल काेलेस्टेराॅल खराब, ७० च्या खाली असावे, डी- म्हणजे डायट आहार- पाैष्टिक, सकस असाव, जंक फूड, चायनीज फूडपासून दूर ठेवावे. ई- म्हणजे नियमित व्यायाम- वय आणि शरीराप्रमाणे चालणे, धावणे, सूर्यनमस्कार, प्राणायाम, याेगासने एफ- म्हणजे फूट, पायांची काळजी घ्यावी.
अशी घ्यावी काळजी
खाण्यापिण्यावर नियंत्रण असायला हवे. किमान सात तास झाेप घ्यावी. याेगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार करणे गरजेचे आहे. नियमित दिवसभरात ८ ते १० हजार पावले चालावे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.