आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्य शासनाकडून महापालिकेला अल्टिमेटम:पाणीपुरवठा योजनांचा 300 कोटींचा आराखडा जुलैअखेर केंद्राकडे जाणार

नाशिक24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहराची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नवीन आणि जुन्या जलवाहिन्यांची दुरुस्ती तसेच पाणीपुरवठा योजनांची संबंधित 300 कोटींचा सुधारीत प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्राला सादर करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जुलैअखेरपर्यंत हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत.

शहराचा चौफेर विकास होत असून दहा वर्षांमध्ये जवळपास सात लाख लोकसंख्याही वाढल्याचा अंदाज आहे. वाढते नागरीकरण, रोजगारानिमित्त नाशिक शहरांमध्ये होणारे स्थलांतरण, पर्यटक व कामानिमित्त येणाऱ्या लोकांमुळे पाण्याची गरज वाढली आहे. ही बाब लक्षात घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत योजनेंतर्गत नाशिक शहराचा भविष्यातील पाणीप्रश्‍न सोडवण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत 1 योजनेतून निधी देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अभ्यासपूर्वक सर्वसमावेशक असा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतली.

अभ्यासाअंती जुन्या जलवाहिन्या बदलणे, नव वसाहतींत जलवाहिन्या टाकणे, जलकुंभांची निर्मिती, जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्यासाठी 1 हजार 200 कोटींची आवश्‍यकता असल्याचे पुढे आले होते. शासनाने 324 कोटी रुपये देण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, यातही पुढे बांधकामांची संबंधित 118 कोटी रुपयांचा खर्च करण्याची जबाबदारी महापालिकेवर ढकलत 226 कोटी रुपयांच्या आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मान्य केला. मात्र तोपर्यंत अमृत 1 योजनेतील निधी संपुष्टात आल्यामुळे महापालिकेचा प्रस्ताव भिजतच पडला होता.

ही बाब लक्षात घेता भाजप आमदार राहुल ढिकले यांनी विधिमंडळ अधिवेशन मध्ये प्रश्न उपस्थित करत नाशिक शहरासाठी 226 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करावा अशी मागणी केली. त्यावर नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अमृत दोन योजनेअंतर्गत हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाईल असे आश्वासन दिले होते.

त्यानुसार आता नगरविकास खात्याने महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला असून त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या नगरविकास विभागाच्या सहसचिव जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापालिकेला पाणीपुरवठा योजनेसाठी सुधारीत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नाशिक शहराचा पाणीप्रश्न सुटणार

विधिमंडळ अधिवेशनामध्ये नाशिक शहरातील पाणीपुरवठा योजनांचा 300 कोटी रुपयांचा आराखडा मंजुरीसाठी प्रश्न उपस्थित केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अमृत -2 योजनेअंतर्गत निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईल असे सांगितले होते. त्यानुसार राज्य शासनाने प्रस्ताव मागितला असून त्यांच्यामार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव गेल्यानंतर मंजुरीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील. यानिमित्ताने नाशिक शहराचा पाणी प्रश्न कायमचा सुटणार आहे. - ऍड. राहुल ढिकले, आमदार, भाजप

बातम्या आणखी आहेत...