आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीत निर्णय:पाणीपुरवठा योजनांचा 300 कोटींचा आराखडा जुलैअखेर केंद्राकडे जाणार ; पाण्याची गरज अजून वाढली

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

झपाट्याने नाशिक शहर वाढत असल्यामुळे नवीन जलवाहिन्यासह जुन्या जलवाहिन्यांच्या दुरुस्ती तसेच पाणीपुरवठा योजनांची संबंधित ३०० कोटींचा सुधारित प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्राला सादर करण्याची तयारी महापालिकेने केली आहे. राज्याच्या नगरविकास विभागाचे सहसचिव पांडुरंग जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जुलैअखेरपर्यंत हा प्रस्ताव सादर करण्याचे आदेश महापालिकेला देण्यात आले आहेत. केंद्र शासनाच्या अमृत -२ योजनेमधून निधी मिळण्याची शक्यता आहे. शहराचा चौफेर विकास होत असून दहा वर्षांमध्ये जवळपास सात लाख लोकसंख्याही वाढल्याचा अंदाज आहे. वाढते नागरीकरण, रोजगारानिमित्त नाशिक शहरामध्ये होणारे स्थलांतरण, पर्यटक व कामानिमित्त येणाऱ्या लोकांमुळे पाण्याची गरज वाढली आहे. ही बाब लक्षात घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृत योजनेंतर्गत नाशिक शहराचा भविष्यातील पाणीप्रश्न सोडवण्यासाठी केंद्र शासनाच्या अमृत १ योजनेतून निधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने अभ्यासपूर्वक सर्वसमावेशक असा आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतली. अभ्यासाअंती जुन्या जलवाहिन्या बदलणे, नव वसाहतींत जलवाहिन्या टाकणे, जलकुंभांची निर्मिती, जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता वाढविण्यासाठी १ हजार २०० कोटींची आवश्यकता असल्याचे पुढे आले होते. शासनाने ३२४ कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, यातही पुढे बांधकामासंबंधीत ११८ कोटी रुपयांचा खर्च करण्याची जबाबदारी महापालिकेवर ढकलत २२६ कोटी रुपयांच्या आराखडा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मान्य केला. मात्र तोपर्यंत अमृत १ योजनेतील निधी संपुष्टात आल्यामुळे महापालिकेचा प्रस्ताव भिजतच पडला होता. ही बाब लक्षात घेता भाजप आमदार राहुल ढिकले यांनी विधिमंडळ अधिवेशनमध्ये प्रश्न उपस्थित करत नाशिक शहरासाठी २२६ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करावा अशी मागणी केली. त्यावर नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी अमृत दोन योजनेअंतर्गत हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानुसार आता नगरविकास खात्याने महापालिकेकडे पाठपुरावा सुरू केला असून त्याचाच एक भाग म्हणून राज्याच्या नगरविकास विभागाच्या सहसचिव जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत महापालिकेला पाणीपुरवठा योजनेसाठी सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

१०० कोटींच्या नवीन जलवाहिन्या महापालिकेने अमृत १ योजनेअंतर्गत सादर केलेल्या जुन्या प्रस्तावात महपालिका हद्दीतील नवनगरांमध्ये जलवाहिनी टाकण्यासाठी १०० कोटी रुपये, जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी ४२.८४ कोटी रुपये, तर जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी ५६.७९ कोटी आणि मीटर बसविण्यासाठी २५.४७ कोटी रुपयांची तरतूद होती. सुधारीत प्रस्तावात नवनगरांमध्ये तसेच गावठाण भागात नव्या जलवाहिन्या टाकण्याबरोबरच दारणा धरणातून थेट जलवाहिनी टाकण्यासाठी तरतूद केली जाणार आहे.

नाशिक शहराचा पाणीप्रश्न सुटणार ^विधिमंडळ अधिवेशनामध्ये नाशिक शहरातील पाणीपुरवठा योजनांचा ३०० कोटी रुपयांचा आराखडा मंजुरीसाठी प्रश्न उपस्थित केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी अमृत -२ योजनेअंतर्गत निधी मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवला जाईला, असे सांगितले होते. त्यानुसार राज्य शासनाने प्रस्ताव मागितला असून त्यांच्यामार्फत केंद्र शासनाकडे प्रस्ताव गेल्यानंतर मंजुरीसाठी युद्धपातळीवर प्रयत्न केले जातील. यानिमित्ताने नाशिक शहराचा पाणीप्रश्न कायमचा सुटणार आहे. - अॅड. राहुल ढिकले, आमदार, भाजप

बातम्या आणखी आहेत...