आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंबड येथील भंगार बाजारात हवेत गोळीबार करीत दहशत निर्माण केल्याचा प्रकार बुधवारी रात्री घडला. दोन व्यवसायिकांमधील आर्थिक वादातून हा प्रकार घडल्याने पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अंबड भंगार बाजार येथील गुन्हेगारी पुन्हा समोर आली आहे.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शब्बीर अहमद खान, (वय 41) धंदा- व्यापार, रा. अंबड लिंक रोड, अंबड, नाशिक व त्यांचा भाऊ सोहेल यांचे भंगार व्यवसायाच्या कमिशन वरून मुन्ना उर्फ मोहम्मद सोबत वाद झाले. त्यानंतर मुन्ना याने त्याच्या सहकाऱ्यांना बोलवून घेतले. यावेळी आसिफ खान यांनी त्याच्याकडे असलेल्या पिस्तुलातून हवेत गोळीबार केल्याचे फिर्यादी खान यांनी सांगितले.
या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुलाम बुरअली शेख, सदाम नुरअली शेख, अली हुसेन शेख, रजा नुरअली शेख, साहिल पठाण, मुन्ना उर्फ महंमद हासिम खान, आसिफ शेख, मुन्ना शेख यांच्यासह अन्य संशितांवर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक आयुक्त सोहील शेख, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगीरथ देशमुख, सहाय्य्क निरीक्षक वसंत खतेले, उपनिरीक्षक उत्तम सोनवणे, संदीप पवार यांच्यासह अंबड पोलीस ठाण्याचे पथक व गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 चे वरिष्ठ निरीक्षक आनंद वाघ व पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी अंबड पोलिसांनी एका संशयित आरोपीला अटक केली असून अन्य फरार संशयितांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आले आहेत. पुढील तपास सुरू आहे.
भंगार व्यवसायिकांकडे सर्रासपणे पिस्तूल - अंबड येथील भंगार बाजार हा नेहमीच चर्चेचा विषय ठरत असतो. येथील व्यवसायिक हे गुंड प्रवृत्तीचे असल्याचे वारंवार समोर आले आहे. अनेक व्यवसायिकांकडे सर्रासपणे पिस्तूल बंदूक आढळून आले आहेत. त्यामुळे यापूर्वी गोळीबाराच्या घटना समोर आल्या आहेत मात्र पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच या घटना वारंवार घडत असल्याचे समोर येत आहे. या व्यवसायिकांकडे असे शस्त्र येतातच कसे? हा एक प्रश्न असून याकडे आयुक्तांनी लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.