आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात कोरोनापासून दिलासा न मिळतो तोच डेंग्यू आणि चिकुनगुन्या या विषाणुजन्य साथींचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आतापर्यंत डेंग्यूचे ६,३७४ रुग्ण अाढळले आहेत. डेंग्यूमुळे मरण पावलेल्या रुग्णांची संख्या ११ वर पोहोचली आहे. चिकुनगुन्याचीही रुग्णसंख्या १,५३७ वर पाेहाेचली आहे. यातील बहुतांश केसेस विदर्भातील आहेत. लहान मुलांंमध्येही या साथीचा मोठा संसर्ग झाल्याचे दिसून येत असले तरी घाबरून न जाण्याचे व योग्य उपचार घेण्याचे आवाहन आरोग्य खात्याकडून करण्यात आले आहे.
गेल्या आठवडाभरात कोरोना पॉझिटिव्हिटी दर घटत असला तरी विषाणुजन्य साथींचे प्रमाण वाढले आहे. यात डेंग्यू, चिकुनगुन्या व आरएसव्ही या साथींचे रुग्ण आढळत आहेत. लहान मुलांंमध्ये ही साथ अधिक गंभीर रूप धारण करत असल्याने मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे. मात्र, हे आजार जिवावर बेतणारे नसून याचा कोरोनाशी संबंध नसल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्य खात्याने केले आहे. कमी न होणारा ताप, पायाच्या स्नायूंना सूज, प्रसंगी उलट्या होणे किंवा पोटदुखी अशी लक्षणे या साथीत दिसून येत आहेत. बालरुग्णालयांत माेठ्या प्रमाणात मुलांना उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे.
ही घ्या काळजी
मुलांमध्ये आरएसव्हीचा संसर्ग
हे आजार सामान्यपणे पावसाळ्यात होणारे आहेत. त्यात ताप आणि अंगदुखी ही कोरोनासदृश लक्षणे असली तरी लोकांनी घाबरून जाऊ नये. १५ वर्षांखालील मुलांंमध्ये थोडी गंभीर लक्षणे दिसत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागते आहे. यात आरएसव्ही या विषाणूची लागण दिसून येत आहे. - डॉ. प्रदीप आवटे, साथरोग नियंत्रण अधिकारी
दिव्यांग-ज्येष्ठ नागरिकांना घराजवळच दिली जाईल लस, केंद्र सरकारची मंजुरी
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि चालण्यास असमर्थ असलेल्या लोकांना घराजवळच कोरोनाची लस दिली जाईल. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लसीकरण केंद्रापर्यंत जाण्यास असमर्थ असलेल्या लोकांसाठी घराजवळ लसीकरणाची व्यवस्था करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. अशा लोकांना लसीकरणासाठी कुठेही अर्ज करण्याची गरज नसेल. आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांच्यातर्फे जारी निवेदनात म्हटले आहे की, गरजू लोकांच्या घराजवळच लसीकरण केंद्रे तयार करून त्यांना डोस देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पॉझिटिव्हिटी दर ५% पेक्षा जास्त असल्यास सणासुदीत निर्बंध येणार
केंद्र सरकारने सणासुदीचे दिवस लक्षात घेऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठीही दिशानिर्देश जारी केले आहेत. त्यानुसार, ५% पेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी दर असलेल्या भागात गर्दीचे समारंभ आयोजित करू नयेत. देशात सध्या ५१ जिल्ह्यांत संसर्गाचा दर ५% पेक्षा जास्त आहे, तर ३७ जिल्ह्यांत हा दर १०% किंवा त्यापेक्षा जास्त आहे. ३० जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर ५% ते १०% आहे. सध्या उत्तर भारतातील बहुतांश राज्यांत दर ५% पेक्षा खाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.