आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी पुरस्कार वितरण:राज्याने दोन पावले टाकावीत, केंद्र चार पावले पुढे येईल, राज्यपाल कोश्यारी यांचे आवाहन

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळात संपूर्ण देश लाॅकडाऊनमध्ये होता, तेव्हा फक्त शेतकरी अन्नधान्य, भाजीपाला पिकवत होते. शेतकऱ्यांमुळे देश हा सुरक्षित राहिला. महाराष्ट्र शेतीप्रधान राज्य असून त्याचा आदर्श घेण्यासाठी उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना बोलावले होते. परंतु, राज्यातील शेतकऱ्यांनी अधिक विकासासाठी दोन पावले पुढे टाकल्यास, केंद्र सरकार चार पावले पुढे टाकेल. त्यासाठी राज्यपाल म्हणून मी प्रयत्न करेन, असे आश्वासन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिले. राज्यात भोंगा ‘लावालावी’ सुरू असल्याचे अजित पवार यांनी सांगितले असून ज्याला लावायचा त्याने लावावा, मी मात्र त्यावर काही बोलणार नाही, असेही कोश्यारी यांनी सांगितले.

कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना कृषी पुरस्कार सोहळा १ व २ मे रोजी नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयोजित करण्यात आला होता. या वेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १९७ शेतकऱ्यांना पुरस्कार वितरित करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोहळ्याला ऑनलाइन उपस्थिती लावली.

राज्यपाल म्हणाले की, पूर्वी अमेरिकेहून खराब आलेले धान्य खावे लागत होते. आता आपला देश अन्नधान्याची निर्यात करत आहे. महाराष्ट्रात आता सेंद्रिय शेतीदेखील वाढली आहे. श्रीमंत शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या गरीब शेतकऱ्यांसाठीदेखील मदत करावी. प्रत्येक शेतकऱ्यांनी ठिबक पद्धतीचा अवलंब करण्याची गरज असून त्याने पाण्याची बचत होईल.

उसाची शेती करताना त्यापासून इथेनाॅल तयार केले तर शेतकऱ्यांना त्याचा लाभ होईल. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, राज्यात उसाची शेती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, जोपर्यंत सर्वच ऊसतोड होणार नाही, तोपर्यंत कारखाने बंद होणार नाही. यासाठी कारखान्यांना पाच रुपये प्रति किलोमीटर वाहतुकीसाठी सबसिडी देण्यात येणार आहे. या वेळी कृषिमंत्री दादा भुसे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले विचार मांडले.

पुरस्काराच्या रकमेत पाचपट वाढ करणार
राज्य सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या कृषी पुरस्कारांची रक्कम ही कमी असून सध्या दरवर्षी त्यासाठी १७ लाख खर्च केले जातात. पुढील वर्षापासून या रकमेत पाच पटीने वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.

बारामतीचे राजेंद्र पवार यांनी नाकारला पुरस्कार
राज्यपालांनी महात्मा फुले, सावित्रीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधाने केल्याने मी त्यांच्या हस्ते पुरस्कार घेणार नसल्याचे बारामती तालुक्यातील पिंपळी येथील राजेंद्र पवार यांनी एका वाहिनीला सांगितले हाेते. ते कार्यक्रमास गैरहजर हाेते.

हमखास दरासाठी पीक घ्यावे : मुख्यमंत्री
विकेल ते पिकेल याप्रमाणे शेतकऱ्यांनी बाजारात मागणी असलेले पीक हमखास भावासाठी घ्यावे. शेतीत प्रयोग व्हावेत, पण काही पिकांचे जुने वाण आरोग्यदायी आहेत का हे तपासून बघावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. शेतकरी सुखी असला तर देशदेखील सुखी असतो. शेतकरी हे आपल्या देशाचे वैभव असून कोरोनाकाळात शेतकऱ्यांनीच देश वाचवला असे सांगत व पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचा गौरव करत अभिनंदन केले.

बातम्या आणखी आहेत...