आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाव्य कधी मुक्तछंदी असते तर कधी यमक धरून लयीत येते, कधी त्याची गझल होते तर कधी ते शृंंगार लेवून येते, कुठे त्यातून विद्रोह उमटतो तर कुठे जगण्याची तरलता काव्य सांडत जाते. पुढे त्याच काव्यातील शब्दसुरांच्या झुल्यावर बसून आंदोळा-हिंदोळा घेऊ लागतात तेव्हा त्या हिंदोळ्यात रसिकही सामील होतात आणि त्या सुरावटींत समरसून जाता हीच अनुभूती रसिकांनी ‘शब्दसुरांचा झुला’ या कार्यक्रमातून घेतली.
शहरातील कवींच्या शब्दांना स्वरसाज चढवत संगीत, नृत्य आणि शब्दांतून हा काव्यझुला सजत गेला. कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात शुक्रवारी (दि. १३) काव्यसंगीत प्रस्तुत झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात कविता शिंगणे यांच्या नजर दुरवरी ऐसी लागावीजाणिवनेणिवांची तमा न उरावी या कवितेने झाली.
पुढे रिमझिम ही पुन्हा की भास तुझा हा सांगना दिसलीस तू की बरसली सर पुन्हा सांगना... या संगीता ठाकूर चव्हाण यांच्या कवितेला सुरावटींवर नेतानाच नृत्यांगणा सुमुखी अथनी यांनी त्यातील तरल भाव नृत्यातून मांडले त्याला रसिकांनी दाद दिली.
त्यानंतर राजू देसले यांची आकार-निराकाराच्या द्वंद्वात काही घडून गेल्यानंतरचा निळाशार सन्नाटा ही उद्गार कविता सादर करण्यात आली. स्वाती पाचपांडे यांची दूरदूर रानात, हिरव्या बनात तरल मनात दाखल झाला सखा श्रावण या पावसाच्या कवितेने एक वेळीच अनुभूती रसिकांनी घेतली. शब्दांची जादू या संजय कंक यांच्या शब्द वार आहे, शब्द धारधार आहे शब्दांनी जखमा होतात, शब्द तलवार आहे या कवितेने शब्दभावना प्रकट झाल्या. यासह पुष्कर चोळकर, सुशीला संकलेचा यांच्याही कविता या कार्यक्रमात सादर झाल्या. कवितांना अनिल धुमाळ यांचे संगीत होते. तर काव्यगायन आणि स्वरसाज मिलिंद धटिंगण, राजश्री शिंपी, विवेक केळकर, अलोक जोशी यांचे होते. यावेळी काव्यचित्र रेखायन हे पूजा बेलाेकर, दिनेश पैठणकर यांचे होते तर प्रकाशयोजना विनोद राठोड यांची होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.