आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हृदयरोग, मूत्रपिंड व कर्करोग विभागातील यंत्रणा मुदतबाह्य झाली आहे. यामुळे उत्तर महाराष्ट्रातून येथे येणाऱ्या रुग्णांना खासगी रुग्णालयाचा रस्ता धरावा लागताे आणि आर्थिक फटका बसत आहे. मागील सहा महिन्यांत येथे २५४७ अँजिओग्राफी, १०१४ अँजिआेप्लास्टी तर केवळ १२७ बायपास करण्यात आल्या आहेत.
संदर्भ सेवा रुग्णालयाने महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेचा सर्वाधिक लाभ रुग्णांना प्राप्त करून दिला आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे रुग्णालयातील अनेक यंत्रणा वारंवार बंद पडत असल्याचे चित्र आहे. या रुग्णालयात मूत्रपिंड, कॅन्सर, हृदयाशी संबंधित विकारांवरच उपचार केला जातो. यात सर्वाधिक हृदयाशी संबंधित शस्त्रक्रिया या रुग्णालयात केल्या जातात.
खासगी रुग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येणारी बायपास शस्त्रक्रियाही संदर्भ रुग्णालयात दररोज केली जाते. त्याचबरोबर अँजिओग्राफी व अँजिआेप्लास्टी शस्त्रक्रिया ही या रुग्णालयात होतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातील हृदयरोग विभागामधील काही अतिमहत्त्वाच्या यंत्रणा अचानक बंद पडत आहेत. त्यामुळे या रुग्णालयातील हृदय शस्त्रक्रियेवरही परिणाम होत आहे. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान हृदयरोग विभागात यत्रणेची अडचण असतांना ही रुग्णालयात १२७ बायपास शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.रुग्णालयातील यत्रणा मुदतबाह्य झालेली असल्याने उत्तर महाराष्ट्रासह इतर भागातून येणारे रुग्णांचे हाल होत आहेत.
रुग्णांचे हाल थांबण्याची गरज...
हृदयरोग विभागातील कॅथलॅब मशीन वारंवार खराब होते. आमचा पेशंट शस्त्रक्रियेसाठी घेऊन गेले आणि मशीन बंद पडल्याने आेटीमधून बाहेर आणले. - अलीम पिरजादा, नागरिक
शस्त्रक्रिया सुरूच आहेत....
हृदयरोग विभागासाठी नवीन कॅथलॅब मशीन येणार आहे. यंत्रणा मुदतबाह्य झाली तरी शस्त्रक्रिया सुरू आहेत. - डॉ. िवलास पाटील, वैद्यकीय अधीक्षक, संदर्भ रुग्णालय
निधी मंजूर, निविदा रखडली
हृदयरोग विभागातील कॅथलॅब मशिनची मुदत २ वर्षांपासून संपली आहे. ही यंत्रणा खरेदीसाठी शासनाकडून मंजुरीदेखील मिळालेली असून अमरावती आणि नाशिकच्या संदर्भसाठी नऊ कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, निविदा प्रक्रिया दोन वर्षांपासून रखडलेली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.