आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांगांच्या याेजना, अडचणींकडे दुर्लक्ष:प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांना घेराव

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या जिल्हा समाज कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी दिव्यांग बांधवांच्या याेजना व अडचणींकडे दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ प्रहार संघटनेच्या नेतृत्वाखाली बुधवारी (ता. 17) दिव्यांग बांधवांनी जिल्हा समाज कल्याण अधिकारी याेगेश पाटील यांना घेराव घातला.

प्रहार संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख दत्तु बाेडके यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागाच्या कार्यालयात येऊन जिल्हा समाज कल्याण अधिकारी पाटील यांना जाब विचारला. शहरात गेल्या आठवड्यात राज्याचे दिव्यांग आयुक्त ओमप्रकाश देशमुख आले हाेते.

याबाबतची माहिती दिव्यांग बांधवांना का देण्यात आली नाही. दिव्यांग बांधवांच्या वैयक्तिक लाभाच्या याेजनांबाबतची माहिती का देण्यात आली नाही? समाज कल्याण विभागा फक्त शाळांचे अनुदान वाटप करणे व त्यांच्या अडचणी साेडविण्यासाठीच कार्यरत आहे का? घरकुल योजना, राखीव दिव्यांग निधी, दिव्यांग विवाह योजना होणारी दिरंगाई आदी प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर समाज कल्याण अधिकाऱ्यांनी घेराव घातलेल्या दिव्यांग बांधवांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रशासनाच्या वतीने साेशल मिडीयाच्या माध्यमातून माहिती देण्यात आल्याचे सांगितले. मात्र तरीही दिव्यांग बांधवांचे समाधान न झाल्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमाेर समाज कल्याण विभागाच्या विराेधात घाेषणाबाजी करत सबंधित अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी संघटनेचे पदाधिकारी दिलीप दिघे, जिल्हाध्यक्ष बबलु मिर्झा, शहराध्यक्ष ललित पवार, रुपेश परदेशी यांच्यासह दिव्यांग बांधव माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.

जिल्हा परिषदेत केली साफसफाई

दिव्यांग बांधवांनी सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत जिल्हा परिषद आवारात आंदोलन केले. या काळात आंदोलनकर्त्यांनी समाज कल्याण विभागासह जिल्हा परिषदेतील प्रवेशद्वाराजवळच्या कचऱ्याची साफ सफाई करून प्रशासनाचे लक्ष वेधले.

वैयक्तिक लाभाच्या याेजनांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

''समाज कल्याण विभागाने 22 मे राेजी सेसच्या 5 टक्के अनुदानातून राबवण्यात येणाऱ्या दिव्यांग बांधवांच्या वैयक्तिक लाभाच्या याेजनेपासून दिव्यांगांना हेतुपुरस्कर वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला. 22 मे सूचना काढून 30 जुन पर्यंत प्रस्ताव मागवले. प्रत्यक्षात मात्र ही माहिती दिव्यांग बांधवांपर्यंत पाेहाेचवलीच नाही.''- दत्तु बाेडके, उत्तर महाराष्ट्र प्रमुख, प्रहार संघटना

बातम्या आणखी आहेत...