आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रसंगावधानाची चर्चा:पोलिसास हृदयविकाराचा झटका, कृत्रिम श्वासोच्छवास देत युवकाने वाचवले प्राण

प्रतिनिधी | मनमाड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील भर बाजारपेठेत असलेल्या सराफ बाजाराजवळील कोहिनूर दुकानाजवळून नागेश दांडे नावाचा रेल्वे पोलिस दुचाकीवरून ड्युटीवर जात असताना त्याच्या छातीत दुखू लागले. तो दुचाकीवरून खाली पडला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे तेथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी झाली. याप्रसंगी नागरिक मदत करण्याएवजी फोटो काढण्यातच दंग होते. चांदवड तालुक्यातील कातरवाडी येथील भागवत झाल्टे याने नागेश दांडे यांनी या व्यक्तीस हृदयविकाराचा झटका आला असावा असा अंदाज केला. क्षणाचाही विलंब न करता दोन्ही हाताने त्यांच्या छातीवर दोन तीन वेळा दाब दिला. त्यानंतर नागेशच्या तोंडावर रुमाल टाकून तोंडाने कृत्रिम श्वासोच्छवास दिला. तीनचार वेळा केल्यानंतर पोलिस कर्मचारी नागेश दांडे शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांना तातडीने डॉ. संदीप कुलकर्णी यांच्या रुग्णालयात दाकल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केली असता नागेशला हृदयविकाराचा जोरदार धक्का आल्याचे निष्पन्न झाले. मात्र, झाल्टे यांनी दाखविलेल्या समयसूचकतेमुळे दांडे यांचे प्राण वाचले.

तीन वर्षांपूर्वी मनमाडजवळील शिंगवे येथे तलावात तीन मुले पाण्यात बुडून मृत झाली होती. त्यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. राहुल खाडे यांनी झाल्टे यांना बोलावून या मुलांना बाहेर काढले होते. गेल्या वर्षी हडबीच्या शेंडी या डोंगरावरून पडून औरंगाबादच्या दोघा गिर्यारोहकांचा मृत्यू झाला. त्यावेळेस देखील झाल्टे यांचा तेथील मदतीत मोलाचा सहभाग होता. मागील वर्षी बैलपोळ्यात रापली कातरवाडी तलावात बैल बुडत असतानाही भागवत झाल्टे यांनी या बैलांना २०० फूट दूर पाण्यातून ओढत किनाऱ्याला आणून वाचवले होते. भागवत झाल्टे यांची परिसरामध्ये चांगला गिर्यारोहक म्हणून ओळख आहेच. मात्र, सदैव दुसऱ्यांना मदत करणारा व्यक्ती अशी त्यांची नवीन ओळख यामुळे तयार झाली आहे.