आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर फसवणूक:वीज पुरवठा खंडीत करण्याच्या बहाण्याने ग्राहकाला 90 हजारांचा गंडा

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोबाईलवर वीज जोडणी खंडीत करण्याचा संदेश पाठवत सायबर भामट्याने ग्राहकाला 90 हजारांचा गंडा घातला. संदेश पाठवल्यानंतर आरोपीने ग्राहकाला एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. अ‌ॅपमध्ये ग्राहकाने आपले बँक खात्याची माहिती भरताच आरोपीने क्रेडीट कार्डच्या माध्यमातून 90 हजारांची खरेदी केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

अशी केली फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील रविकांत काळे यांना 22 मेरोजी तुमचे वीज बिल थकीत आहे. काही वेळात वीज जोडणी खंडीत केली जाईल, असा संदेश मोबाईलवर आला. संदेशामध्ये एका व्यक्तीचा संपर्क क्रमांक दिला होता. काळे यांनी त्यावर फोन केला असता समोरील व्यक्तीने आपले नाव दीपक शर्मा असे सांगितले. तुम्ही आत्ता बिल भरले तर कारवाई थांबवली जाईल, असे सांगत आरोपीने काळे यांचा विश्वास संपादन केला. काही वेळात मोबाईलवर क्विक सपोर्ट ॲपची लिंक पाठवत ती लिंक डाऊनलोड करण्यास सांगितले. काळे यांनी ॲप डाऊनलोड केले. ॲप ॲक्टिवेट करण्यासाठी 10 रुपये ऑनलाईन पेमेंटही केले. अ‌ॅप इन्स्टॉल करताना काळे यांनी आपल्या बँक खात्याची सर्व माहिती भरली. त्यानंतर या बँक खात्यातून क्रेडिट कार्डचा वापर करत संशयिताने ऑनलाईन 90 हजार 338 रुपयांची खरेदी केली, अशी तक्रार काळे यांनी दिली आहे.

मोबाईल केला हॅक

सायबर भामट्याने ॲप डाऊनलोड करण्यास सांगत काळे यांचा मोबाईल हॅक केला. त्यामुळे काळे यांच्या मोबाईलवर संदेश येत नव्हते. त्यांनी क्रेडिट कार्डचे बँक स्टेटमेंट काढले असता त्यांना बँकेतून 90 हजारांची रक्कम काढून घेतल्याचे निदर्शनास आले.

बातम्या आणखी आहेत...