आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन शैक्षणिक धोरणाबाबत अजूनही अनेक शिक्षकांना पुरेशी माहिती नाही. त्यामुळे या शैक्षणिक धोरणाविषयी सर्व स्तरावर व्यापक चर्चा व विचारमंथन व्हायला हवे. अनेक लोक त्याविषयी अनभिज्ञ आहेत. शिक्षणाची अवस्था खेदजनक असून, शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टीवरील खर्च कमी न करता तो वाढायला हवा. शिक्षण हक्क ही शासनाची जबाबदारी असून, विनाअनुदानित शाळा हे सूत्र पूर्णपणे चुकीचे आहे. सर्वच शाळा शंभर टक्के अनुदानित कराव्यात, असे मत पदवीधर मतदारसंघाचे आमदार सुधीर तांबे यांनी केले. इंडिपेंडंट सेकंडरी अँड हायर सेकंडरी टीचर्स युनियन (इस्तु) या संघटनेच्या नवव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इस्तुचे अध्यक्ष रोहित गांगुर्डे होते. व्यासपीठावर उद्योजक राज पानसरे, माजी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, देवेंद्र उबाळे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी तांबे म्हणाले, देशात शिक्षकांच्या पाच लाख जागा रिक्त आहेत. शिक्षण क्षेत्रात आज दोन वर्ग निर्माण झाले असून, एकीकडे चकाचक इंग्रजी माध्यमाच्या शाळा तेथे विशिष्ट विद्यार्थी संख्येमागे दोन-दोन शिक्षक आहेत आणि शासकीय शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून वेगळा अजेंडा राबविण्याचा डाव असल्याने शिक्षकांनी त्यास विरोध करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी प्रा. गंगाधर आहिरे, सुप्रसिद्ध हास्यकवी मिर्झा बेग आदींची भाषणे झाली. यावेळी संघटनेच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिक्षक गौरव पुरस्कारांचे ३२ शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. किशोर शिंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. रोहित गांगुर्डे यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी लिहिलेल्या ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० : संक्षिप्त दृष्टिक्षेप’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. नवीन शैक्षाणिक धोरणाविषयी असलेला पालकांमधील गैरसमज शिक्षकांनी दूर करावा, शिक्षकांनाही याविषयी मार्गदर्शक सूचना मिळाव्यात, अशी अपेक्षा या कार्यक्रमात व्यक्त करून शिक्षकांनी आपली सेवा बजावताना अपडेट राहणे गरजेचे असल्याचे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.