आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांसाठी गूड न्यूज:सिमेंटचे 6 मॉडेल रोड होणार; गॅसपाईपलाईन, फुटपाथ, मलवाहिका, इलेक्ट्रिक केबल असेल अंतर्भूत

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोट्यावधी रुपये खर्च करून दरवर्षी किरकोळ कारणास्तव रस्ते खोदले जात असल्याने महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार यांनी मलवाहिका, इलेक्ट्रिक केबल, गॅसपाईपलाईन, कॅचपिट, फुटपाथसह शहरातील सहा विभागात सहा मॉडेल रोड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यासाठी 18 मीटरपेक्षा अधिक रुंद असलेल्या रस्त्यांची निवड केली जाणार आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये नवीन रस्ते तयार करा व महिना दोन महिन्यांच्या अंतरावर त्यावर खोदकाम करा असे नवीन सत्र सुरू झालेले आहे. मोबाईल, इंटरनेट,घरगुती गॅस, वीज व पाणी जोडणी तसेच नानाविध कारणांसाठी केबल टाकण्याच्या कारणास्तव रस्ते खोदले जात आहे. काही ठिकाणी रस्ते खोदकामाचा बदल्यांमध्ये महापालिकेला डॅमेज चार्जेस भरले जातात. मात्र या माध्यमांमधून मिळणाऱ्या निधीतून संबंधित रस्त्यांची व्यवस्थित देखभाल दुरुस्ती होत नसल्यामुळे कालांतराने संपूर्ण रस्त्याला खड्डे पडून त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो.

ही बाब लक्षात घेत पालिका आयुक्त पवार यांनी आपला मुंबई महापालिकेतील कामकाजाचा अनुभव वापरून शहरांमध्ये पहिल्या टप्प्यात सहा मॉडल रोड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. हे रस्ते सिमेंटचे असणार असून त्यावर प्रत्येक तीस मिटरवर क्रॉसिंग पॉईंट राहणार आहे.

असा असेल मॉडेल रोड

रस्ता कोठेही खोदण्याची गरज पडू नये यासाठी प्रत्येक 30 मीटर अंतरावर क्रॉसिंग पॉईंट असणार आहे. ट्राफिक डिव्हाईडरसह रस्त्याच्या मधोमध सुशोभिकरणा साठी जागा सोडण्यात येणार आहे.पाणीपुरवठा,मलनिस्सारण,भुयारी गटारीच्या स्वतंत्र अंडर लाईन्स राहणार आहेत.इलेक्ट्रिक केबल,गॅसपाईप लाईन साठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहेत.रस्त्याच्या आजूबाजूचे पाणी वाहून जाण्यासाठी कॅचपिटची व्यवस्था असणार आहे.तसेच 18 मीटर पेक्षा मोठा रस्ता असल्यास त्या ठिकाणी स्वतंत्र सायकल ट्रॅकची व्यवस्था केली जाणार आहे.

सर्व सुविधायुक्त चांगले रस्ते मिळणार

कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला रस्ता पुन्हा पुन्हा पडल्यास त्याचा दर्जा राहत नाही. त्यामुळे भविष्यात रस्ते खोदण्याची गरज पडणार नाही अशा पद्धतीने सर्व सुविधायुक्त सहा स्वतंत्र मॉडेल रोड विकसीत केले जाणार आहे. सहा विभागात 18 मीटर पेक्षा अरुंद असलेल्या रस्त्यांचे सर्वेक्षण केले जाणार आहेत. - रमेश पवार, महापालिका आयुक्त

बातम्या आणखी आहेत...