आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहनपर शिष्यवृत्ती देण्यासाठी दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) घेतली जाते. १२ फेब्रुवारी २०२३ ला होणाऱ्या परीक्षेसाठी नाशिक जिल्ह्यातून ४२ हजार ६७० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. नियमित शुल्कासह शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी १५ डिसेंबर २०२२ पर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यात वाढ केली असून २० डिसेंबरपर्यंत अर्ज करता येईल. ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अर्ज केलेले नाही, त्यांना अजूनही संधी आहे.
गेल्या वर्षी झालेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर झाला. या परीक्षेस पाचवीचे २३.९० टक्के तर आठवीचे १२.५४ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. नाशिक जिल्ह्यात पाचवीसाठी २० हजार ९२२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १९ हजार ४४५ विद्यार्थी परीक्षेला हजर होते. तर आठवीसाठी १७ हजार ५६४ विद्यार्थ्यांपैकी १६ हजार ४०३ विद्यार्थी परीक्षेला हजर राहिले. एकूण ३८ हजार ४८६ पैकी ३५ हजार ८४८ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेला उपस्थित होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाचवी व आठवीच्या विद्यार्थी संख्येत ४ हजार १८४ ने वाढ झाली आहे. अर्जासाठी अजून संधी असल्याने यंदाच्या वर्षी दोन्ही परीक्षांना प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ होईल, अशी शक्यता शिक्षण विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या वर्षी घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल जाहीर झाला असून त्यानंतर गुणपडताळणीसाठी अर्ज करण्याची मुदतही संपली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष अंतिम निकाल व गुणवत्ता यादीकडे लागले आहे. इयत्ता पाचवीच्या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत दरवर्षी १००० रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. तर इयत्ता आठवीच्या परीक्षेतून पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांना दहावीपर्यंत वार्षिक १५०० रुपये शिष्यवृत्तीच्या माध्यमातून दिले जातात.
कोविडकाळात घटलेली परिक्षार्थ्यांची संख्या यंदा वाढली
शैक्षणिक वर्ष २०२० मध्ये कोविडच्या अगोदर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षेला नाशिकसह राज्यभरात ९ लाख ७२ हजार विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यानंतर मात्र, कोविडमुळे दोन वर्षे शाळा बंद होत्या. या दोन वर्षांच्या काळात अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहाबाहेर गेले. शिष्यवृत्ती परीक्षेबाबत माहिती न मिळाल्याने तब्बल अडीच लाखाने विद्यार्थी संख्या कमी झाली.
२०२२ मध्ये ७ लाख १६ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. कोविडनंतर आता पुन्हा एकदा कमी झालेली पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून शिक्षणाधिकारी, प्रशासनाधिकारी यांच्यासह शिक्षक व मुख्याध्यापकांना सूचना देण्यात आल्या. पाचवी व आठवीच्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना परीक्षेची माहिती देऊन प्रोत्साहन देण्याचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे यंदाच्या वर्षी विद्यार्थी संख्येत वाढ झाली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.