आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी वसुंधरा पुरस्कार:नाशिक जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींचा पर्यावरण दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मान

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील पिंपळगाव, चांदोरी व शिरसाठे या तीन ग्रामपंचायतींसह नाशिक विभागासाठी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, तर उत्कृष्ट कामगिरीत मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांना पर्यावरण दिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

पंचतत्वाचे संवर्धन, संरक्षण व जतन करून शाश्वत विकास साधण्यासाठी सुरु केलेल्या 'माझी वसुंधरा अभियानात 2021-22 च्या स्पर्धेतील मानकऱ्यांना मुंबई येथे गौरविण्यात आले. या अभियानात सलग दुसऱ्या वर्षी निफाड तालुक्यातील पिंपळगांव बसवंत ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय प्रथम क्रमांक मिळवला आहे.

निफाड तालुक्यातीलच चांदोरी ग्रामपंचायतीने राज्यस्तरीय तृतीय क्रमांक मिळवला आहे. तर इगतपुरी तालुक्यातील शिरसाठे ग्रामपंचायतीला पृथ्वी या घटकासाठी विशेष राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. अभियानाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचाही सन्मान करण्यात आला. माझी वसुंधरा अभियानांतर्गत नाशिक जिल्ह्याने सलग दुसऱ्या वर्षी उत्कृष्ट कामगिरी केली.

मुंबई येथील नरीमन पाँईंटजवळील टाटा थिएटर येथे रविवारी (दि.5) आयोजित कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उप मुख्यमंत्री अजित पवार, ग्रामीण विकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन, राजशिष्टाचार पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे मंत्री आदित्य ठाकरे, पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे राज्यमंत्री संजय बनसोडे , विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर- म्हैसकर आदी उपस्थित होते.

पृथ्वी, वायू, जल, अग्नी, आकाश या पंचतत्वाच्या आधारे राबविण्यात येणा-या या अभियानात नाशिक जिल्हयातील 10 हजाराच्या वर लोकसंख्या असलेल्या 15 तर 10 हजारापेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या 81 अशा एकुण 96 ग्रामपंचायतींनी सहभाग घेतला होता. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड तसेच पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ व माझी वसुंधरा अभियानाचे नोडल अधिकारी अधिकाऱ्यांनी अभियानाचे प्रभावी संनियंत्रण केले.

जिल्हयातील 3 ग्रामपंचायतींना पुरस्कार मिळणे ही जिल्हयासाठी अभिमानाची व आनंदाची बाब आहे. सर्व गावांचे ‘गाव कृती आराखडे’ तयार करुन त्यानुसार अंमलबजावणी करण्यात आली. यापुढे देखील माझी वसुंधरा अभियानामध्ये शासनाकडून निवडण्यात येणा-या ग्रामपंचायतींमध्ये पर्यावरणपुरक गाव तयार करण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...