आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागजी परिसरात धुमाकूळ:रात्रीचा थरार; चक्कर मारायला घराबाहेर पडलाे, येऊन बघताे तर बंगल्यात बिबट्या

नाशिक11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी जेवण झाल्यानंतर मुलीला घेऊन चक्कर मारायला म्हणून बाहेर पडलाे. दहा-पंधरा मिनिटे झाले असतील, परत येऊन बघताे तर बंगल्यापुढे नागरिकांची गर्दी हाेती. पावले झराझर उचलत घराकडे गेलाे तर काही जणांनी तुमच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये बिबट्या असल्याचे सांगितले. लगेच घरात फाेन करून दारं-खिडक्या तत्काळ बंद करायला सांगितले. अन्यथा बिबट्या जर घरात शिरला असता तर काय झाले असते याची कल्पनाही केली जात नाहीये... काझीनगरच्या आरफा हाऊस या बंगल्यात राहणारे आशीर काझी रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या बंगल्याभाेवती घडलेला बिबट्याचा हा थरार सांगत हाेते.

द्वारकाकाला लागूनच असलेल्या नागजी हाॅस्पिटल परिसरापासून जवळच असलेल्या काझी नगरमध्ये रात्री उशीरा नागरिकांना बिबट्या दिसून आला. त्यांानी लगेचच वनविभागाला माहिती देताच वनविभागाचे कर्मचारी तत्काळ त्या ठिकाणी दाखल झाले. बंगला परिसरात बिबट्या दिसताच त्याला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन फेकण्यात आले. त्याला ते लागलेही मात्र तरी बिबट्या दुसरीकडे पळून गेला.

ताे कुठे पळून गेला हे मात्र शाेधण्यात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना माेठी कसरत करावी लागली. वडाळाराेड, पखालराेड आणि काझी नगर हा इमारती, बंगल्यांनी भरलेला माेठा परिसर आहे. त्यामुळे हा बिबट्या नक्की कुठे गेला असेल त्याच्या शाेधात वनविभागाचे कर्मचारी हाेते. नागरिकांनी माेठी गर्दी केल्याने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळे निर्माण हाेत हाेते. अखेरीस एका ठिकाणी बिबट्याला पकडण्यात कर्मचाऱ्यांना यश आले.

शंका आल्याने पाहिले तर गाडीखाली बिबट्या
मी रात्री उशिरा आलाे. घराबाहेर गर्दी हाेती. घराचे गेट उघडले. मात्र मला शंका आली त्यामुळे आतमध्ये जरा इकडे तिकडे पािहले तर गाडीखाली बिबट्या हाेता. लगेच वनविभागाला कळविले. त्यांनी बिबट्याला पकडले. - एजाज काझी, उपअभियंता, महापालिका

ट्रकमधूनच बिबट्या या भागात आल्याची चर्चा
या परिसरात काही ट्रक उभे राहतात. त्यात फळे पॅक करण्यासाठी जे कागद वापरतात, कात्रणे वापरतात ते असतात. ते ट्रक या ठिकाणी रात्री उशिराने आले असता त्या ट्रकमधूनच बिबट्या बाहेर पडून रहिवासी क्षेत्रात शिरल्याची चर्चा या परिसरातील नागरिकांमध्ये हाेती.

बातम्या आणखी आहेत...