आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअंगावर रोमांच उभे करणाऱ्या स्वातंत्र्यलक्ष्मीचे गीत लिहिणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मृतींना स्वातंत्र्याच्या अमृत महाेत्सवात वेळाेवेळी उजाळा दिला गेला. त्याचवेळी नाशिकमधील तिळभांडेश्वर लेनमध्ये स्वातंत्र्यवीरांनी स्थापन केलेली स्वातंत्र्यलक्ष्मीची मूर्ती मात्र केविलवाणी होऊन अभिनव भारत मंदिराच्या हालअपेष्टा बघत आहे. उखडलेल्या फरशा, तुटलेली तावदाने आणि कोसळलेल्या भिंती... हे दृश्य आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत मंंदिराचे. तिळभांडेश्वर लेन येथील अभिनव भारत मंदिर ही वास्तू चांगली हाेती असे म्हणावे लागेल. मात्र त्याच्या नूतनीकरणाचा घाट घालण्यात आला आणि यंत्रणेने वास्तूची दयनीय अवस्था करून ठेवली आहे.
या ठिकाणी पर्यटक आणि देशप्रेमींनी यावे, वास्तू बघावी याचा प्रयत्न स्तुत्य असला तरी सध्या ही वास्तू अखेरच्या घटका माेजत आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. २८ मे २०२२ रोजी स्वातंत्र्यवीर सावरकरांची जयंती या अभिनव मंदिरात साजरी झाली. मात्र श्रेयवादाच्या नादात त्याच दिवशी या वास्तूच्या नूतनीकरणास सुरुवात झाली. त्यासाठी घाईघाईत कार्यक्रमादरम्यानच येथील फरशा उखडण्यासाठी कारागीर आले हाेते. मात्र येथील नागरिकांनी येथे कार्यक्रम आहे. ताे झाल्यावर काय करायचे ते करा असे म्हटल्यानंतर कार्यक्रम हाेताच येथील फरशा उखडण्यात आल्या आहेत. मात्र त्यानंतर कामाचा वेग मंंदावल्याने सर्वत्र गवताचेच साम्राज्य पसरले आहे.
ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण करूनच काम करावे...
अभिनव भारत मंदिर हे वीर सावरकरांच्या मालकीचे आहे. येथे काम करण्याआधी या ठिकाणी असलेल्या भाडेकरूंना विश्वासात घेतले पाहिजे. तसेच, ही जागा शासनाने ताब्यात घेण्याची प्रक्रिया करावी व त्यानंतरच काम सुरू करावे. - शाहू खैरे, माजी नगरसेवक
अभिनव भारत मंदिराचे काम लवकरच सुरू
अभिनव भारत मंदिराच्या विकासकामासाठी राज्य शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने आधीच पाच कोटी निधी मंजूर केलेला आहे. आता पुन्हा १ कोटी वाढवून घेण्यात आला आहे. आर्किटेक्टकडून नविन वास्तूची डिझाइन ही तयार करण्यात आलेली आहे. लवकरच कामांनाही सुरुवात केली जाणार असून रुपडे पालटणार आहे. - प्रा. देवयानी फरादे, आमदार
नूतनीकरणासाठी अशी तयारी सुरू
तिळभांडेश्वर लेनमधील या वाड्यात १८९९ ते १९०९ या काळात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा मुक्काम होता. येथेच १९०४ मध्ये स्वातंत्र्यदेवतेेची मूर्ती स्थापन करून सावरकरांनी अभिनव भारत या क्रांतिकारी संघटनेची स्थापना केली. या अभिनव मंदिराच्या संवर्धनासाठी राज्य शासनाच्या पर्यटन खात्यातर्फे पाच कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला आहे.
निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ठेकेदार नियुक्त करण्यात आला आहे. वास्तुविशारद निनाद बोथरा यांनी आराखडाही सादर केला आहे. वाड्याची मूळ रचना कायम ठेवून बेसॉल्टचा वापर करून हे नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी येथील बाबाराव सावरकर सभागृहातील दुर्मिळ छायाचित्रे आणि पुस्तके हलवण्यात आली आहेत. त्यातून ग्रंथालय, प्रदर्शनी, शिल्पे उभारण्यात येणार आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.