आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

दिव्य मराठीतर्फे कोरोना गुरुवंदना:‘टिलीमिली’ फक्त शैक्षणिक मालिका नाही, तर लोकशिक्षणाची चळवळ

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
विवेक सावंत : अध्यक्ष, महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशन व टिलीमिलीचे संकल्पक
  • काेराेना काळातही राज्यातील दीड कोटी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला ज्ञानरचनावाद

मार्च २०२० पासून कोरोनाच्या संंकटामुळे शाळा, महाविद्यालये आणि सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या आहेत. या काळात कोट्यवधी विद्यार्थ्यांचे औपचारिक शिक्षण बंद आहे. विशेषत: पहिली ते आठवीपर्यंतचे शिक्षण घेणारे विद्यार्थी स्वयंअध्ययन प्रभावीपणे करू शकत नाहीत. ऑनलाइन शिक्षणासाठी अनेक विद्यार्थ्यांकडे स्मार्टफोन नाहीत. त्यामुळे राज्यात सर्वत्र जी गोष्ट उपलब्ध आहे तिचा वापर करून राज्यातील तब्बल दीड कोटी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा मिळवून देणारा आमचा ‘टिलीमिली’ उपक्रम विद्यार्थ्यांसह शिक्षक, पालकांमध्येही लोकप्रिय झाला आहे. लवकरच टिलीमिलीचे दुसरे सत्र घेऊन येणार आहोत.

लॉकडाऊन जाहीर झाल्यावर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या सूचनेवरून मी ‘टिलीमिली’ची संकल्पना मांडली. या संकल्पनेचे स्वागत झाले. विद्यार्थ्यांचे आरोग्यरक्षण, पोषण आणि शिक्षण ही त्रिसूत्री मनात ठेवून ‘टिलीमिली’च्या कामाला सुरुवात केली. जे माध्यम अधिकाधिक विद्यार्थ्यांकडे उपलब्ध आहे अशा टेलिव्हिजन माध्यमाचा वापर करण्याचे ठरवले. त्यानुसार दूरदर्शनला विनंती केली. त्यांनी प्रत्येक भागासाठी अकरा हजार रुपये, अशी रक्कम भरण्यास सांगितले. आम्ही ४८० भागांचे नियोजन करून दूरदर्शनकडे ५५ लाख रुपये भरले आणि २० जुलैपासून २८ सप्टेंबरपर्यंतचे भाग तयार करण्याचा निर्णय घेतला. ‘टिलीमिली’चा प्रत्येक भाग आशयपूर्ण, कृतिशील उपक्रमांचा व प्रयोगशील असावा यासाठी आमची मोठी टीम सातत्याने कार्यरत आहे. उदय पंचपोर संपूर्ण निर्मिती आणि व्यवस्थापन पाहतात. रेवती नामजोशी अकॅडमिक मॉडेल तसेच आशयाकडे लक्ष देतात. अमित रानडे, श्रद्धा गोटखिंडीकर प्रत्यक्ष चित्रीकरण, कलादिग्दर्शनापासून सर्व बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष पुरवतात. प्रसोद नामजोशी आमचे दिग्दर्शक आहेत. शब्दांकन - जयश्री बोकील, पुणे

ज्ञानरचनावादाचे मॉडेल
टिलीमिली सादर करण्यासाठी आम्ही पारंपरिक फळा, खडू, शिक्षक, पाठांतर ही पद्धत बाजूला ठेवून ज्ञानरचनावादाला प्राधान्य दिले. स्टुडंट्स निर्माण करण्यापेक्षा लर्नर्स घडवण्याकडे लक्ष केंद्रित केले. त्यामुळे कृतिशील उपक्रमांतून पाठ्यपुस्तक समजून घेणे हा गाभा ठरला. टिलीमिलीच्या प्रत्येक भागातून विद्यार्थ्यांसमोर छोटी छोटी आव्हाने ठेवत गेलो. विद्यार्थ्यांना स्वतंत्र विचार करणे, त्याची अभिव्यक्ती करणे, सर्जनशीलता जपणे व त्यातून कृतिशीलता अशा क्रमाने प्रत्येक भाग तयार केला. सोमवार ते शनिवार टिलीमिलीचे भाग प्रसारित हाेतात. राज्याच्या अतिदुर्गम भागातूनही या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे याचे समाधान वाटते.

टिलीमिली - लोकशिक्षण चळवळ
राज्यभरातील सुमारे दीड कोटी विद्यार्थ्यांपर्यंत टिलीमिली पोहोचते आहे. केवळ पहिली ते आठवीचे विद्यार्थीच नव्हे, तर असंख्य पालक आणि आजी-आजोबासुद्धा ही मालिका आवर्जून पाहतात. कुठलीही जाहिरात न घेता टिलीमिलीचा ‘टीआरपी’ दूरदर्शनच्या बातम्यांच्या पाठोपाठचा आहे. दुर्गम भागातील काही शिक्षकांनी गावासाठी टीव्ही सेट मिळवून टिलीमिली विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आहे. अनेक शिक्षक स्वत:च्या घरातील टीव्ही विद्यार्थ्यांसाठी मुक्त ठेवत आहेत. या साऱ्यांतून टिलीमिली केवळ शैक्षणिक मालिका न राहता लोकशिक्षणाची जणू चळवळ बनली आहे आणि याचे समाधान फार मोठे आहे.

दिव्य मराठी कोरोना गुरुवंदनेतील सत्कारमूर्ती शिक्षक