आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज अभियंता दिन:‘तिघी’ सक्षमपणे निभावताहेत ‘समृद्ध’ जबाबदारी

नाशिक / दीप्ती राऊत5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
समृद्धी प्रकल्पावर काम करताना संगीता जैस्वाल, अश्विनी घुगे आणि बबिता जोशी. - Divya Marathi
समृद्धी प्रकल्पावर काम करताना संगीता जैस्वाल, अश्विनी घुगे आणि बबिता जोशी.

बायका एकत्र आल्या की फक्त गप्पा आणि गॉसिप होणार अशी अटकळ बांधली जाते. पण त्या एकत्र आल्या तर नेमकं काय करू शकतात याचे उदाहरण म्हणजे समृद्धी महामार्ग प्रकल्पातील पॅकेज १ ची टीम. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता अशा बिनीच्या पदांच्या जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडणाऱ्या तिघीजणी अर्थात संगीता जैस्वाल, अश्विनी घुगे आणि बबिता जोशी.

सार्वजनिक बांधकाम खात्यात काही शेकड्यांनी इंजिनिअर्स कार्यरत आहेत. त्यापैकी समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पावर ४०-५० इंजिनिअर्स काम करीत आहेत. त्यात नागपूर ते वर्धा या पहिल्या पॅकेजच्या उभारणीत या तिघींचा महत्त्वाचा वाटा आहे. सरकारी असली तरीही दहा ते पाच अशा चाकोरीबद्ध कामापलीकडची ही जबाबदारी. त्यांच्याच शब्दात सांगायचं म्हणजे “स्वप्नवत’ प्रकल्प. शून्यातून उभे केलेले बांधकाम. जंगलवाटांमधून जन्माला घातलेला रस्ता. महसूल, वन, जलसंपदा, पर्यावरण अशा अनेक खात्यांसोबत समन्वय साधण्याची कसरत. अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्याची संधी आणि शिकण्याची “समृद्धी’ही. महिला म्हणून कधीही मर्यादा जाणवल्या नाहीच, उलट संवाद, समन्वय, सचोटी व समर्पण या गुणांचा व कौशल्यांचा उपयोगच झाल्याचे त्या सांगतात.

समर्पणाने केलेले काम महत्त्वाचे
अधीक्षक अभियंता आणि एमएसआरडीसीच्या प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पावर २०१७ च्या पहिल्या टप्प्यापासून संगीता जैस्वाल जबाबदारी पार पाडत आहेत. १९९२ साली त्यांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला तेव्हा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये हाताच्या बोटांवर मोजण्याएवढ्याच मुली दिसत होत्या. इथे मुलींचं काय काम या काॅमेंट्स ऐकतच शिक्षण पूर्ण केलं, पण सार्वजनिक बांधकाम खात्यात एवढ्या वर्षांच्या सेवेत मात्र एकदाही अशाप्रकारची कॉमेंट ऐकायला मिळाली नसल्याचे त्या आवर्जून नमूद करतात. प्रामाणिकपणे आणि समर्पणाने काम केले तर तुम्ही बाई आहात की पुरुष हे महत्त्वाचे रहातच नाही, हे त्या मानतात.

गरोदरपणातही स्लॅबवर केले काम
बाई म्हणून कधी सवलती मागितल्या नाहीत तर इतरही आपल्याला “बाई’ म्हणून वागवत नाहीत हा अनुभव बबिता जोशी सांगतात. गरोदर असताना स्लॅबवर काम केल्याची आठवण त्या सांगतात. सध्या त्या “समृद्धी’च्या पॅकेज १ वर सहायक अभियंता श्रेणी १ या पदावरआहेत. त्यांच्या मुलीला सिव्हिल इंजिनिअरिंगला प्रवेशासाठी गेल्या असता, अन्य पालकांची शंका ऐकून त्यांना गंमत वाटली. “२० वर्षांपासून आम्ही सिव्हिल इंजिनिअर म्हणून क्षमता सिद्ध करीत आहोत, मात्र अजूनही पालक का घाबरतात?’ हा त्यांचा प्रश्न.

आपल्या क्षमतांवर विश्वास महत्त्वाचा
कार्यकारी अभियंता अश्विनी घुगे या तर सार्वजनिक बांधकाम विभागातून बढतीवर या प्रकल्पावर आल्या. काम करताना कधीही आपल्या क्षमतांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले नसल्याचे त्या सांगतात. आपण आपल्या क्षमतांवर आत्मविश्वास बाळगला पाहिजे असे त्या मानतात. अर्थात, अशाप्रकारच्या जबाबदारीवर काम करताना, तुमचे बाईपण कमीपणाचे किंवा सोयीचे उरतच नाही, तुमचे काम महत्त्वाचे ठरते हे त्यांचे अनुभवातून शिकलेले सूत्र त्या आवर्जून सांगतात.

घडवण्याचा आनंद आणि निर्मितीचे समाधान
खासगी क्षेत्रात इंजिनिअर्सना खूप संधी असते, मात्र शासकीय सेवेत इंजिनिअर म्हणून काम करताना, आपण बांधलेल्या रस्त्यामुळे, पुलामुळे लोकांचे प्रश्न सुटतात, तेेव्हा त्यांचा आनंद वेगळे समाधान देत असल्याचे या तिघीही सांगतात. “समृद्धी’च्या प्रकल्पात काम करताना शून्यातून सुरुवात केल्याने, लोकांचा विश्वास नव्हता. एवढे आह्वानात्मक काम पूर्णत्वास जाईल हे स्वप्नवत वाटत होते. ते आज उभे राहिलेले बघतानाचा आनंद त्यांची ताकद बनतो आहे.

श्रेय पालक, वरिष्ठ आणि कुटंबाला
अशा मेगा प्रोजेक्टवर काम करण्याचा विश्वास टाकला याबाबत या तिघीही एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांचे आभार मानतात. सोबतच ज्या पद्धतीने पालकांनी वाढवले आणि कुटुंबाने साथ दिली त्यांना इथपर्यंतच्या प्रवासाचे श्रेय देतात. आम्ही दोघी बहिणी, पण आई-वडिलांनी दोघींमध्येही स्वावलंबनाने उभे राहण्याचा आत्मविश्वास निर्माण केल्याचे अश्विनी घुले सांगतात. मी तर जैस्वाल कुटुंबातून आले, मात्र केवळ पालक आणि कुटुंबाच्या साथीमुळेच हे काम करू शकत असल्याचे संगीता जैस्वाल नमूद करतात. कुटुंब आणि करिअर या दोन्ही आघाड्यांवरची कसरत कुटुंबियांमुळेच सुकर होत असलल्याचे बबिता जोशी आ‌वर्जून नमूद करतात.

बातम्या आणखी आहेत...