आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनधारकांची अडथळ्यांची शर्यत:पंचवटीतील तपोवनपासून पाथर्डी फाट्यापर्यंत वाहतूक कोंडी; कुठे आहेत पोलिस?

नाशिकरोड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक-पुणे महामार्गावर नाशिकरोडला पोलिस ठाण्यासमोरच पालिकेच्या उड्डाणपुलाखाली सतत वाहतूक कोंडी होत असते. त्यामुळे या ठिकाणी रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांना जीव मुठीत धरावा लागतो. सध्या बिटको चौकात वाहतूक पोलिस नसल्याने या ठिकाणी सिग्नल मोडण्याचे प्रकार होत आहे.

नाशिकरोड येथे बिटको ते मेनगेट या ठिकाणी रस्त्यावरच खासगी ट्रॅव्हलच्या गाड्या उभ्या असतात. शहर वाहतूक बसही ‌थांबतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडी नेहमीच होत असते. नाशिकरोड पोलिस ठाण्यासमोर रस्ता ओलांडण्यासाठी जागा असून या ठिकाणी भाजीपालाविक्रेते व्यवसाय करीत असल्याने या ठिकाणी कायम गर्दी असते. येथे एकेरी वाहतूक करण्याची गरज आहे.

वडाळानाका चौफुलीवरील सिग्नल बंद
वडाळानाका चौफुलीवरून रोजच छोट्या-मोठ्या वाहनांसह अवजड वाहनांचीही मोठी वर्दळ असते. द्वारका, वडाळानाका हा नागरी वस्तीचा भाग असल्याने पादचारी, सायकलस्वारांचीही संख्या मोठी असते. अशी परिस्थिती असताना येथील सिग्नल यंत्रणा गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. परिणामी, या ठिकाणी सातत्याने वाहतूक कोंडी होऊन पादचारी, वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच मार्गक्रमण करावे लागत आहे. मुख्य म्हणजे, येथील सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नसल्याने मुंबईनाका सर्कलवरही वाहतुकीचा ताण पडत असल्याने येथील सिग्नल सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सर्व सिग्नल बंद; पोलिस बेपत्ता
उड्डाणपुलाखालील अंडरपास चौकातील वाहतूक सुरक्षिततेसाठी व वाहन कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सिग्नल मंजूर करून त्याची उभारणी महापालिकेच्या माध्यमातून करून घेतली आहे. मात्र, हे सिग्नल अद्याप कार्यान्वित होण्याच्या प्रतीक्षेत असल्याने सध्या सिग्नल केवळ शोभेपुरताच ठरत आहे. सिग्नल कार्यान्वित झाल्यानंतर वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार असल्याचे वाहनचालकांनी सांगितले. तसेच, वाहतूक पोलिसही या ठिकाणी गैरहजर रहात असल्याचे चित्र आहे.

पाथर्डी फाटा परिसरात कायमच कोंडी
पाथर्डी फाटा परिसरात सहा रस्ते एकत्र येतात. येथे नव्याने मुंबई, कसारा आदी ठिकाणी जाणाऱ्या गाड्यांचे वाहनतळ तयार झाले असून अनेक गाड्या सर्रासपणे सर्व्हिसरोडवरच उभ्या राहतात. रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे पाथर्डी फाटा परिसरातील अंडरपास चौक कायमच वाहतूक कोंडीच्या गर्तेत सापडलेला असतो. सायंकाळी तर पायी जाणेसुद्धा अवघड होत आहे.

भाजीविक्रेत्यांमुळे कोंडीत भर
नाशिकरोड उड्डाणपुलाखाली रस्त्यावर रिक्षा उभ्या केल्या जातात तसेच फेरीवाले आणि व्यावसायिकांच्या दुकानांपुढे पार्किंग केलेल्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. बिटको चौकाच्या सर्व दिशांना रिक्षाचालक बेशिस्तपणे उभे असतात. त्यामुळे नाशिक, जेलरोड, देवळालीगाव किंवा सिन्नर फाटा येथे वळणे अवघड जाते. उड्डाणपुलाखाली ३०० भाजी व फळविक्रेते आहेत. तेथे भाजीपाला खरेदीसाठी ग्राहक मोठी गर्दी करतात.

अतिक्रमणे हटवावीत
उड्डाणपुलाखालील चौफुल्यांवर अतिक्रमण वाढले असून फळविक्रेत्यांसह इतर अतिक्रमण वाढल्याने कोंडी वाढली आहे. ही अतिक्रमणे हटविण्याची गरज आहे. - हेमंत जाधव, नागरिक

पोलिसांची नेमणूक करा
उड्डाणपुलाखाली वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. रात्री व सकाळी प्रचंड कोंडी होते. प्रत्येक अंडरपासमध्ये वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी. - अमोल पवार, वाहनचालक

दोन पोलिस नेमले
इंदिरानगर बोगद्यावर आणि जवळील अंडरपासमध्ये सकाळी कंपनी कामगारांची गर्दी तसेच इतर वाहतुकीचा ताण वाढल्याने काहीकाळ वाहतूक कोंडी होते. दोन शिफ्टमध्ये वाहतूक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत राहते. - दिनकर कदम, वरिष्ठ पोलिस निरीक्षक वाहतूक शाखा

राणेनगर बोगद्यात सकाळी व सायंकाळी वाहतूक कोंडी
राणेनगर येथील बोगद्यात दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत आहे. या ठिकाणी इंदिरानगरकडून तसेच सर्व्हिसरोडवरून येणारी वाहने बोगद्यातून प्रवेश करतात. अशीच परिस्थिती सिडकोकडूनही होत असल्याने सकाळी व सायंकाळी या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होते. बोगद्यापासून हाकेच्या अंतरावर बऱ्याचदा इंदिरानगर पोलिस ठाण्याचे कर्मचारी नाकाबंदीसाठी उभे असतात. मात्र वाहतूक कोंडी दिसूनही ते कोणतीही कारवाई करीत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...