आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विश्लेषण:ट्रेनची अफवा, सोशल मीडियाचा प्रचार की राजकीय षड्यंत्र ? जमावामागील कारणाचा शोध

नाशिकएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • जमावाला स्वयंघोषित नेता विनय दुबेची फूस...रात्री उशिरा अटक

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील कामगारांसाठी खास जनसाधारण रेल्वे सोडण्यात येणार असल्याची सोशल मीडियातून पसरलेली अफवा, लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याच्या पंतप्रधानांच्या संबोधनानंतर अडकलेल्या कामगारांमध्ये खदखदणारी अस्वस्थता आणि या साऱ्याचा फायदा घेऊन राजकीय पोळी भाजण्याचा नेत्यांचा प्रयत्न या साऱ्यातील नेमके कारण काय, याचा शोध गृहमंत्रालयाने सुरू केला आहे. लॉकडाऊनच्या काळात राजधानीतील संचारबंदी आणि नाकेबंदी झुगारून काही मिनिटांत वांद्रे रेल्वे स्टेशनजवळ हजारो मजुरांचा जमाव संघटित होणे, रेल्वे सुरू करण्याची घोषणाबाजी करणे आणि काही क्षणांतच यावरून राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार, शिवसेना विरुद्ध भाजप या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या सुरू होणे, केंद्रीय गृहमंत्र्यांनी फोन करणे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्याचे स्पष्टीकरण देणे या चार तासांच्या घटनाक्रमाभोवती राजकीय षड‌्यंत्राच्या संशयाचे ढग जमा झाले आहेत. 

२२ मार्चला रात्री जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात सहा लाख परराज्यांतील कामगार अडकून पडले आहेत. त्यांच्या राहण्या-खाण्याची सोय अन्य राज्यांप्रमाणे महाराष्ट्रानेही केली असली तरी त्यातील गैरसोयीमुळे असंतोष धगधगत होता. राज्यानेही या कामगारांना स्वगृही परतण्यासाठी २४ तास रेल्वे सोडण्याची मागणी केंद्राकडे केली होती. परंतु केंद्राने त्याची दखल घेतली नसल्याचे पंतप्रधानांच्या सकाळच्या निवेदनावरून स्पष्ट झाले आणि परप्रांतीय कामगारांच्या छावण्यांमध्ये सोशल मीडियावरील अफवांनी धुमाकूळ घातला. स्थलांतरित कामगारांमधील धगधगत्या असंतोषात राजकीय तेल ओतण्यात आले. अडकलेल्या कामगारांसाठी खास जनसाधारण रेल्वे सुरू करण्याचा विचार असल्याचे तेलंगण सरकारचे पत्र व्हायरल झाले. रेल्वे सोडण्याच्या मागणीसाठी चार वाजता वांद्रे स्टेशनवर जमणार असल्याचा मेसेज पसरला आणि संचारबंदीला हुलकावणी देऊन काही मिनिटांतच हजारोंच्या संख्येने जमाव जमला. त्याची दृश्ये प्रसारित होताच राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाल्याने यामागे संघटित राजकारण असण्याला दुजोरा मिळत आहे. 

ही गर्दी जमल्यावर काही मिनिटांतच शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटद्वारे याचे खापर केंद्र सरकारवर फोडून, महाराष्ट्रात अडकलेल्या ६ लाख परराज्यांतील कामगारांना स्वगृही परतण्यासाठी किमान २४ तास रेल्वे सुरू करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना केल्याचे जाहीर केले. इतकेच नाही तर वांद्रे स्टेशन व सुरतमधील दंगल यामागे स्थलांतरित कामगारांना स्वगृही परतण्याबाबत केंद्र सरकारचे निर्णय न घेणे जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यावर भाजपचे माजी मंत्री आशिष शेलार, माजी खासदार किरीट सौमय्या यांनी वांद्य्रातील जमाव हे केंद्राचे नाही तर राज्याचे अपयश असल्याचे प्रत्यारोप केले. 

जमावाला स्वयंघोषित नेता विनय दुबेची फूस...रात्री उशिरा अटक

या जमावाला विनय दुबे या स्वयंघोषित नेत्याने फूस लावल्याची चर्चा आहे. मजूर, गरिबांंचा विचार न करता हे लॉकडाऊन लादल्याचा आरोप करत दुबेने सोशल मीडियावर भाजपविरोधी अभियान सुरू केले आहे. मुंबईत अडकलेल्या उत्तर प्रदेश व बिहारच्या मजुराना गावी पाठवण्याची नि: शुल्क व्यवस्था करावी, अशी मागणी दुबे करत आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्याचा व व्यवस्था न झाल्यास १८ एप्रिलला आंदोलनाचा केंद्राला इशारा देणारा व्हिडिओ मजुरांमध्ये व्हायरल झाला होता. यावरून त्याला अटक करण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...