आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात अनेक ठिकाणी बेकायदा शालेय विद्यार्थी वाहतूक सुरू आहे. अनेक वाहनचालक विद्यार्थी वाहनातून प्रवास करताना मोबाइलवर बोलतात. तसेच क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करत आहेत. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे डी. बी. स्टारच्या पाहणीत दिसून आले. शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेत व्यवस्थापन समिती कार्यरत आहे. मात्र, या व्यवस्थापन समित्या कागदावरच असल्याची धक्कादायक बाब डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आली आहे.विद्यार्थांना या धोकादायक वाहतूकीवर डी. बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत....
स्कूल बस, रिक्षांसह लहान कारमधून विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. रिक्षा, व्हॅन, लहान कारमध्ये क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त विद्यार्थ्यांना कोंबून त्यांची ने-आण केली जाते. मुख्य म्हणजे, अशी वाहतूक करणाऱ्यांकडून अनेकदा सुरक्षिततेविषयक खबरदारी घेतली जात नाही. यामुुळे अनेकदा अपघातही घडले आहेत. यामुळे पोलिस आयुक्तालय कार्यालयात पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच शालेय विद्यार्थी वाहतुकीसंदर्भात बैठक झाली. यात स्कूल बस नियमावली २०११ अनुसरून विद्यार्थ्यांच्या वाहतूक सुरक्षिततेबाबत चर्चा करण्यात आली. शालेयस्तरावर परिवहन समित्यांची बैठक नियमितपणे घेण्यात यावी, प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तयार केलेल्या संकेतस्थळावर सर्व शाळांची माहिती अद्ययावत करावी.
परिवहन समित्यांच्या बैठकीची माहिती तसेच शाळेशी करारबद्ध असणाऱ्या स्कूल बसेसची माहिती आणि विद्यार्थी वाहतुकीबाबत काही तक्रारी असल्यास संकेत स्थळावर तक्रारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.या बैठकीनंतर शहरातील बेकायदा शालेय वाहतूक करणार्यांवर वचक बसेल तसेच, शाळा व शालेय वाहतूक करणार्या वाहनचालकांकडून नियमांचे पालन केले जाणार असल्याची अपेक्षा शहरातील नागरिकांकडून केली जात होती. मात्र, विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांना शासनाकडून नियम ठरवून दिलेले असतानाही त्यांच्याकडून या नियमावलीकडे सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले आहे. काही ठिकाणी तर अनेक रिक्षा, स्कूल बस अथवा खाजगी वाहनांमधून वाहतूक पोलिसांसमोरुन क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नेले जात असल्याचे डीबी स्टारच्या पाहणीत दिसून आले. पैशाची बचत होते म्हणून अनेक पालक क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी असूनही त्या वाहनातून आपल्या मुलाला शाळेत पाठवतात. त्यामुळे अवैध वाहतुकीला नेमके जबाबदार कोण, असा प्रश्न ही उपस्थित केला जात आहे.
विद्यार्थ्यांची जबाबदारी घेण्यासही नकार : बहुतांश विद्यार्थ्यांची वाहतूक खासगी शाळांमार्फत हाेते. ही वाहतूक करताना सुरक्षिततेचे उपाय केले जात नाही. ज्या बसेससोबत शाळा विद्यार्थी वाहतुकीसाठी करार करतात ते वाहतुकदारही विद्यार्थी सुरक्षेची जबाबदारी घेताना दिसत नाहीत.
पोलिस आयुक्तांच्या सूचनांकडे दुर्लक्ष पोलिस आयुक्तांकडून शालेय वाहतूक करणाऱ्यांची नुकतीच बैठक घेण्यात आली. यात अवैध आणि क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या शालेय वाहनांवर आरटीओ आणि पोलिस प्रशासनाकडून कारवाई करण्याची सूचना करण्यात आली. मात्र, पोलिस आयुक्तांनी केलेल्या या सूचनेकडे संबंधित दाेन्ही यंत्रणांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे. त्यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे.
पालकांकडून दुर्लक्ष शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेकडे पालकांचेही दुर्लक्ष होत असल्याची बाब समोर आली आहे. आपल्या मुलाची वाहतूक करणारे वाहन नेमके कशावर चालते? त्यात आपला मुलगा किंवा मुलगी सुरक्षित आहे की नाही? जादा विद्यार्थी कोंबल्यामुळे त्याला काही त्रास होतो का? हे जाणून घेण्याची तसदी कोणीही घेत नाही. पालक तक्रार करीत नाहीत म्हणून रिक्षाचालक दक्षता घेत नसल्याचे चित्र आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.