आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदिवासी विकास महामंडळ:बोगस एमएस-सीआयटी प्रमाणपत्र तपासणी; पदोन्नती, वेतनवाढीचे लाभ घेतल्याचे उघड

नाशिक / किशोर वाघएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एमएस-सीआयटीची बोगस, बनावट प्रमाणपत्रे सादर करून आदिवासी विकास महामंडळातील कर्मचाऱ्यांनी पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना आणि वेतनवाढीसह सर्वच लाभ घेतल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे महामंडळाने आता संपूर्ण राज्यातील अशा संशयास्पद कर्मचाऱ्यांची एमएस-सीआयटीची प्रमाणपत्रे तपासण्याचा निर्णय घेतला. नंदुरबार जिल्ह्यातील ८३ कर्मचाऱ्यांची प्रकरणे तंत्रशिक्षण मंडळाकडे तपासणीसाठी पाठवली आहे. त्याचे प्रतिकर्मचारी १०० रुपयांप्रमाणे ८,३०० रुपये तंत्रशिक्षण मंडळाकडे जमा केले.

शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांना सेवेत भरती होताना तसेच पदोन्नती, आश्वासित प्रगती योजना, वेतनवाढ, इतर लाभासाठी एमएससीआयटीचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे. हा निर्णय शासकीय सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांसाठीही देखील लागू करण्यात आला होता. २००७ सालापर्यंतची मुदतही दिली होती. त्यापूर्वीच या कर्मचाऱ्यांनी संगणक प्रशिक्षणाचा कोर्स पूर्ण करुन प्रमाणपत्र सादर करणे आ‌वश्यक होते. त्यास वेळोवेळी मुदतवाढही देण्यात आली. पण आदिवासी विकास महामंडळातील अनेक कर्मचाऱ्यांनी हा कोर्स न करताच थेट बनावट, बोगस प्रमाणपत्रे सादर करुन पदोन्नती, वेतनवाढी, आश्वासित प्रगती योजनेसह इतर सर्वच लाभ पदरात पाडून घेतले. यातील बहुतांश कर्मचारी सेवानिवृत्तही झाले आहेत. पण आता या कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या प्रमाणपत्रांची तपासणी थेट महाराष्ट्र तंत्र व शिक्षण मंडळाकडून करुन घेण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर नंदुरबार जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांची प्रमाणपत्रे तपासली जात आहेत. यातही अनेक प्रमाणपत्र बोगस आणि बनावट आढळून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...