आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वकीलवाडीत गुलमोहर कोसळला:दोन दुचाकी, दुकानांचे नुकसान; शहरात तिसरी घटना, यापूर्वी तिघांचा मृत्यू

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी रोड, वकीलवाडी येथील सारडा संकुलासमोरील गुलमोहराचे झाड अचानक उन्मळून कोसळल्याने दुचाकी दाबली गेली. झाडाचा मोठा बुंदा मोबाइल दुकान आणि पान स्टॉलवर पडल्याने या दोन्ही दुकानांचे नुकसान झाले. गुरुवारी (दि. २३) दुपारी ४ वाजता हा प्रकार घडला. सुदैवाने यामध्ये जीवितहानी टळली शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या एमजीरोडवर हा प्रकार घडला. सुदैवाने या मार्गावर दुपारी रहदारी कमी असल्याने मोठी दुर्घटना टळली. सायंकाळी सुमारे २० वर्ष जुने गुलमोहराचे झाड अचानक कोसळले. याखाली दुचाकी दाबली गेली.

मोबाइल शॉप आणि पान शॉपवर झाडाचा मोठा बुंधा कोसळल्याने या दुकानांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सारडा संकुल मोठे शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी असते. झाड कोसळल्याचा आवाज आल्यानंतर दुकानाच्या समोर उभे असलेले आणि दुकानातील ग्राहकांनी वेळीच पलायन केल्याने दुर्घटना टळली. दरम्यान, वकीलवाडी रस्त्यावर झाड कोसळण्याची ही दुसरी घटना आहे.चार वर्षांपूर्वी गुलमोहराचे झाड कोसळून वित्तहानी झाली होती. झाडाच्या फांद्या विद्युत्त तारांवर कोसळल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. आजच्या घटनेतही वारे वाहत नसताना झाड कोसळल्याने नागरिकांनी अाश्चर्य व्यक्त केले आहे.

‘गुलमोहर’ ठरतेय धोकेदायक, यापूर्वीच्या घटना अशा गुलमोहराचे झाड उन्मळून पडल्याच्या घटना शहरात वारंवार घडत असून त्यामुळे वित्त व जीवितहानी देखील यापूर्वी झाली अाहे. मागील महिन्यात त्र्यंबक रोडवर रिक्षावर गुलमोहराचे झाड पडून रिक्षातील महिला व अन्य एकाचा मृत्यू झाला होता. या दुर्घटनेत रिक्षाचा पुढचा भाग चेंदोमेंदा झाला होता. तर दोन महिन्यांपूर्वीच लेखानगर येथे गुलमोहराच्या झाडाखाली उभ्या असलेल्या युवकाच्या डाेक्यावर या झाडाची फांदी अचानकपणे पडून युवकाचा जागीच मृत्यू झाला होता. आता पुन्हा महात्मा गांधी रोड, वकीलवाडी रस्त्यावर गुलमोहराचे झाड पडले. सुदैवाने त्यात जीवितहानी झाली नाही. मात्र अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे झाले आहे.