आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामॉर्निग वॉकसाठी पेठरोडवरील चामरलेणीवर गेलेल्या एका महिलेचा अरुंद पायवाटेवरून पाय घसरल्याने ती शंभर फूट खोल दरीत कोसळली. परंतु, त्याच वेळी तेथे फिरण्यासाठी आलेल्या दोन डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वत:चा जीव धोक्यात घालत सरळ दरीत उतरून जखमी होऊन बेशुद्ध पडलेल्या या महिलेवर प्रथमोपचार करून तिला तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने या महिलेला जीवदान मिळाले.
चामरलेणी परिसरात व लेणीवर शेकडोंच्या संख्येने राेज नागरिक फिरावयास जातात. त्यात रविवारी नेहमीपेक्षा अधिक गर्दी असते. काही जण येथे पायऱ्या चढून लेणीपर्यंत जातात तर काही पायऱ्या चढून अर्ध्यापर्यंत गेल्यावर पायवाटेने संपूर्ण टेकडीला गोल चक्कर मारतात. पायवाट अरुंद असल्याने थाेडेही लक्ष विचलित झाले तर बाजूला खोल दरीत कोसळण्याची भीती असते. याच वाटेवरून जात असताना नाशिकच्या पंचवटी भागातील प्रियंका संतोष ढाकणे (३५) ही महिला रविवारी पाय घसरून शंभर फूट दरीत पडली. अचानक झालेल्या या घटनेने प्रियंका यांच्या पतीसह इतरांनाही काय करावे काहीच सुचत नव्हते. त्यांना वाचवायचे कसे? काेणाशी संपर्क साधायचा? काेण खाली उतरणार? अशा अनेक प्रश्नांनी डोक्यात गर्दी केली होती. त्यावेळी तेथे फिरण्यासाठी गेलेल्या पंचवटीतील डाॅ. रविकिरण निकम आणि डॉ. गणेश शिंदे यांना हा प्रकार समजला.
दरीत पडल्याने बेशुद्धावस्थेत
क्षणाचाही विलंब न करता दोघेही डॉक्टर आपला जीव धोक्यात घालत दरीत उतरले. त्यावेळी प्रियंका या बेशुद्ध अवस्थेत दिसल्या. हातापायाला जखमा दिसत हाेत्या. डॉ. निकम व डॉ. शिंदे यांनी त्यांच्यावर त्वरित प्राथमिक उपचार करुन त्यांना शुद्धीवर आणले. रुग्णवाहिकाही बोलावून घेतली. इतर नागरिकांच्या मदतीने प्रियंका यांना दरीतून वरती आणून उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. दाेघा डाॅक्टरांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे प्रियंका यांचे प्राण वाचल्याने अनेकांनी डॉक्टरव्दयांची भेट घेत काैुतक करत कृतज्ञता व्यक्त केली.
घटना वेळीच समजल्याने प्राण वाचवण्यात यश
घटना घडली त्या वेळी तेथेच असल्याने थेट दरीत उतरलो. महिला बेशुद्धावस्थेत होती. प्रथमाेपचार करून त्यांना शुद्धीवर आणले. इतर नागरिकांच्या मदतीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. तातडीने उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले. - डाॅ. रविकिरण निकम व डाॅ. गणेश शिंदे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.