आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हस्तगत:रिक्षा प्रवासात दागिने चोरणाऱ्यादोन महिला व चालक जेरबंद; दीड लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत

नाशिक18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिक्षा प्रवासात महिला प्रवाशांचे दागिने चोरणारी टोळी जेरबंद करण्यास मुंबईनाका पोलिसांना यश आले आहे. या टोळीतील रिक्षाचालक आणि दोन महिलांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दीड लाखाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे. बड्डा ऊर्फ अनिल कमरसिंग देंगे (५०, रा. देवळाली कॅम्प), शीतल गोकुळ कसबे (रा. देवपूर, धुळे), अनिता विजय ससाणे (रा. जळगाव) अशी या टोळीच्या सदस्यांची नावे आहेत.

याबाबत पाेलिसांनी दिलेली माहिती अशी, नानी दमण येथील मंगल क्षीरसागर (६५) या वापी येथून त्यांच्या बहिणीला भेटण्यासाठी २५ मे रोजी एसटी बसने नाशिकला आल्या होत्या. द्वारका चौकात उतरून त्या पाथर्डी फाटा येथे जाण्यासाठी रिक्षात बसल्या. काही वेळात आणखी तीन महिला रिक्षात बसल्या. या महिला दाटीवाटी करत असताना शेजारी बसलेल्या महिलेने बॅगची चेन उघडून ३ लाख १३ हजारांचे सोन्याचे दागिने काढून घेतले.

संशयित रिक्षाचालकाने क्षीरसागर यांना राणेनगरला उतरवून दिले. बॅगमध्ये दागिने नसल्याचे लक्षात आले. याबाबत मुंबईनाका पोलिसात तक्रार दिली. या पोलिस ठाण्याचे गुन्हे शोधपथकाला या गुन्ह्यातील रिक्षाचालकाची माहिती मिळाली. त्याला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने संशयित महिलांचे नाव सांगितले. दोन्ही महिलांना शालिमार परिसरातून अटक करण्यात आली. वरिष्ठ निरीक्षक सुनील रोहोकले, के. टी. रौंदळ, सोनार, आप्पा पानवळ आदींनी ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...