आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मराठा आरक्षणप्रश्नी क्रांती मोर्चाच्या वतीने राज्य शासनाला २ डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर ठोक मोर्चा तर बारामतीत महाविकास आघाडी सरकारचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्धार करण्यात आला.
मराठा आरक्षण प्रश्न आता पुन्हा एकदा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यासंदर्भात शनिवारी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांची बैठक झाली. यात मराठा क्रांती मोर्चाने आंदोलनाची भूमिका घेतली. अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये मराठा क्रांती मोर्चा आक्रमक भूमिका घेत आहे. शासनाकडून वारंवार आरक्षणाच्या संदर्भामध्ये आश्वासन दिले जात आहे. परंतु शब्द पाळण्यामध्ये सरकार कुठेतरी अपयशी ठरत असल्याचा ठपका मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी ठेवला आहे. मराठा समाजाच्या आशा-अपेक्षांना पायदळी तुडवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरुद्ध मराठा क्रांती मोर्चाची रविवारी (दि. २९) पुणे येथे बैठक होणार असून यात राज्यपातळीवरील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे.
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक प्रवेश व स्पर्धा परीक्षांमधून पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मुद्दा धोक्यात आला आहे. यातून मार्ग काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाने महाविकास आघाडी सरकारसमोर एसईबीसी, सुपरा न्यूमररी असे काही पर्याय ठेवले होते. या पर्यायांवर विचार करून मराठा समाजाला दिलासा देण्याचे आश्वासन आघाडी सरकारने दिले होते. प्रत्यक्षात मात्र समाजाला अंधारात ठेवून आघाडी सरकारने भरती प्रक्रिया राबवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शैक्षणिक प्रवेश प्रक्रियाही राबवण्यास सुरुवात केली.
बैठकीला राज्य समन्वयक करण गायकर, तुषार जगताप, गणेश कदम, राजू देसले, शिवा तेलंग, उमेश शिंदे, विलास जाधव, बंटी भागवत, संतोष माळोदे, विजय खर्जुल, नवनाथ शिंदे, संजय सोमासे, युवराज सूर्यवंशी, ज्ञानेश्वर भोसले, ज्ञानेश्वर थोरात, मधुकर कासार, शिवाजी मोरे, अमित नडगे, सागर पवार, सुनील भोर, रवी गव्हाणे, मनोहर मुसळे, किरण वाघ, गणेश दळवी, अस्मिता देशमाने, पूजा धुमाळ, पूनम पाटील, मंगला शिंदे, रोहिणी दळवी, कुंदन हिरे, सुमीत जाधव, किरण जाधव अादींसह समाजबांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
ठिकठिकाणी आंदोलनाची भूमिका
सरकारच्या या मराठाद्वेषी भूमिकेमुळे लाखो मराठा विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सकल मराठा समाजाच्या भावना संतप्त झाल्याने क्रांती मोर्चाने ठिकठिकाणी आंदोलनाची भूमिका जाहीर केली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.