आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचण:‘नो हॉकर्स झोन’मध्ये भररस्त्यावर अनधिकृत भाजीविक्रेत्यांचा बाजार; रथचक्र चौक, गुरु गोविंदसिंग महाविद्यालय परिसरातील स्थिती

इंदिरानगर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील रथचक्र चौक ते गुरू गोविंदसिंग महाविद्यालयापर्यंतच्या ‘नो हॉकर्स झोन’मध्ये रस्त्याच्या दुतर्फा भाजीविक्रेत्यांकडून अनधिकृतपणे दुकाने थाटली जातात. त्यामुळे हा रस्ता अरुंद होत असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहे. काही भाजीविक्रेते भाजी ठेवण्यासाठी घाण दुर्गंधीयुक्त चेंबरचा वापर करत असल्याचा धक्कादायक प्रकारही निदर्शनास आल्याने सामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

इंदिरानगरमधील भाजीविक्रेत्यांसाठी कलानगर येथे कृष्णकांत भाजी मंडई व साईनाथनगर चौफुली येथेही स्वतंत्ररित्या भाजी मंडई स्थापन करून दिली आहे. या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहक कमी येत असल्याची उत्तरे देऊन याच भाजी मंडईतील काही विक्रेते रथचक्र चौक, कलानगर, पांडवनगरी, गुरू गोविंदसिंग महाविद्यालय या ठिकाणच्या वर्दळीच्या रस्त्यालगत भाजी विक्रीसाठी बसतात. हे ठिकाण मनपाने ‘नो हॉकर्स झोन’ जाहीर केले असूनही अनधिकृतपणे अतिक्रमण करून भाजीविक्रेते व्यवसाय करतात.

या ठिकाणी विक्री करत असलेला भाजीपाला हा रस्त्याच्या कडेला असलेल्या उघड्या चेंबरमध्ये भाजी ताजी राहण्यासाठी ठेवतात. तसेच भाजी धुण्यासाठी नाल्यातील घाण दुर्गंधीयुक्त पाण्याचा वापर करत असल्याचेही निदर्शनास आले आहे. भाजी घेणारे ग्राहकही रस्त्यात मनमानीपणाने वाहने उभी करत असल्याने दररोज वाहतूक ठप्प होऊन अपघात होत आहे.

याबाबत काही जागरुक नागरिकांनी भाजीविक्रेत्यांवर आक्षेप घेतला असता त्यांना दमदाटी करून अरेरावी केल्याचा प्रकाराही समोर आला आहे. काही दुकानदारच भाजीविक्रेत्यांना आपल्या दुकानासमोरील जागा भाडेतत्त्वावर देऊन एकप्रकारे अशा चुकीच्या गोष्टीला खतपाणी घालत आहे. विक्रेत्यांना स्वतंत्र मंडईत बसण्यासाठी व्यवस्था करून देण्यात यावी. या ठिकाणी बसणाऱ्या अनधिकृत विक्रेत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...