आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापाकीटचे तीन बाॅक्स, गट्टू पाच आणि पक्का धागा सहा असे म्हणत एकाने आपल्याकडील कापडी पिशवीत आणि गाडीच्या डिक्कीत नायलाॅन मांजा भरून घेतला. दुसरा आला, त्यानेही गट्टू, पाकीट असे म्हणत मांजा घेतला आणि निघून गेला. वडाळागाव, विनयनगर, भद्रकालीतील काही भाग आणि काझी गढी या परिसरातील नायलाॅन मांजासाठी असलेला हा काेडवर्ड आता अवैधरित्या नायलाॅन मांजा विक्री करणाऱ्यांसाठी परवलीचा झाल्याचे आम्हालाही कळले. त्यानंतर असेच काेड वापरत ‘दिव्य मराठी’नेही ताे नायलाॅन मांजा सहज मिळवला. त्याचे हे स्टिंग ऑपरेशन...
प्रशासनाने नायलॉन मांजा विक्री व वापरण्यावर बंदी घातली असली, तरी शहरात पंचवटी, रविवार कारंजा परिसरात काही दुकानांत चाेरून नायलॉन मांजाची विक्री केली जात असल्याची बाब ‘दिव्य मराठी’ने शहरातील विविध भागांमध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशनने उघडकीस आली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने इंदिरानगर, वडाळागाव, विनयनगर भागासह जुन्या नाशकातील भद्रकाली परिसरातून ३ नायलॉन मांजाचे गट्टू खरेदी केले. या भागातील घरांमधून, वाहनांच्या डिक्कीतून किंवा अगदी भाजीला जशा आपण कापडी पिशव्या नेताे तशा पिशव्यांमधूनही नायलाॅन मांजाची विक्री हाेेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. विक्रीच्या ठिकाणी काही तरुण मुलांकडून सर्रास घरातून व वाहनांच्या डिक्कीत मांजाचे गट्टू ठेवण्यात आलेले होते. एका गट्टूची किंमत काही ठिकाणी ४०० तर काही ठिकाणी ४५० रुपये आहे. या भागांत कागद किंवा पिशवीत नायलॉन मांजा गुंडाळून ग्राहकांना दिला जात आहे.
‘दिव्य मराठी’ने असा मिळविला नायलाॅन मांजा जुन्या नाशकातील एका ठिकाणी आमचा प्रतिनिधी गेला असता काेडवर्डनुसार तीन ‘पाकीट’ दे असे म्हणताच आधी विक्रेत्याने शिल्लक नसल्याचे सांगितले. त्यानंतर ’पाकीट’ हा काेडवर्ड त्याच्या लक्षात आल्यावर त्याने आढेवेढे घेत प्रतिनिधीला बाजूला नेत दाेन चक्री गाडीच्या डिक्कीतून तर एक कापडी पिशवीतून काढून दिली. त्याचे त्याने १८०० रुपयेही मागितले. मात्र आम्ही जुनेच आहाेत एवढा भाव नाहीये असे त्याला पटवून दिल्यावर त्याने १२०० रुपयांना ताे मांजा आमच्या प्रतिनिधीला दिला. मांजा दिसू नये म्हणून तत्काळ गाडीत ठेवण्याची घाईही त्याने केली.
सहज मिळतो मांजा : इंदिरानगर, वडाळागाव व जुन्या नाशकात लहान-लहान मुलेच नव्हे तर वृद्धांनाही या भागांत नायलाॅन मांजा कुठे मिळताे याची माहिती हाेती. मात्र, पोलिसांना या मांजा विक्रीची माहिती नसेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
कडक कारवाई करणार... शहर हद्दीतील पोलिस ठाणेनिहाय नायलॉन मांजाबाबत करण्यात आलेल्या कारवाईची व संशयितांची माहिती संकलित करण्यात येऊन छापासत्र राबविले जाणार आहे. तसेच, प्रतिबंधित नायलॉन मांजाचा वापर व विक्री करणाऱ्यांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील. जुने नाशिक, वडाळागाव व इंदिरानगर भागात विशेष मोहीम राबवून कडक कारवाई केली जाईल. - प्रशांत बच्छाव, पोलिस उपायुक्त (गुन्हे)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.