आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे महामार्गाने द्वारकाकडे येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने वळविण्यात आल्याने या रस्त्यावर अपघात वाढले आहे. गुरुवारी (दि. १५) कलानगर सिग्नल परिसरात सकाळी एका कंटेनरने दुचाकीला दिलेल्या धडकेने दाेघे जखमी झाले तर सायंकाळी या परिसरापासून पुढे काही अंतरावर ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने एकजण जखमी झाला आहे.
परिणामी, वडाळा-पाथर्डी मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र डी.बी. स्टारच्या पाहणीत दिसून आले. या मार्गावरून अवजड वाहनांना अनेकवेळा अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे भविष्यातही अशा घटना घडून दुर्घटना हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दाट लाेकवस्तीतून हाेणारी अवजड वाहनांची वाहतूक थांबविण्यासाठी पोलिस प्रशासनाकडे स्थानिक नागरिकांनी मागणी केली हाेती. मात्र, या मागणीकडेही दुर्लक्ष केले जात असल्याचे समोर आले. या धोकादायक रस्त्यावर डी.बी. स्टारने टाकलेला हा प्रकाशझोत...
महापालिकेने लाखो रुपये खर्च करून नागपूर येथे निर्माण केलेल्या रस्त्याच्या धर्तीवर पाथर्डी गावापर्यंतचा रस्ता दोन टप्प्यांत तयार केला. त्यामुळे परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे. या रस्त्यावर विनयनगर, इंदिरानगर, साईनाथनगर, सार्थकनगर, कलानगर, पांडवनगरी, शरयूनगर, समर्थनगरसह विविध उपनगरे आहेत. हा रस्ता अंबड औद्योगिक वसाहतीत जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने दिवसभर अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असते. तसेच या रस्त्यावर प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालय असल्याने दिवसभर विद्यार्थ्यांचा वावर असताे.
असे असताना गेल्या वर्षभरापासून द्वारका चौकातून निर्बंध घालण्यात आलेले मालट्रक, ट्रेलर, कंटेनर, टँकर अशी अवजड वाहने वडाळा गाव, कलानगर चौक, वडाळा - पाथर्डी रस्त्यावरून वळविण्यात आली आहेत. त्यामुळे या मार्गावरून मार्गक्रमण करणारे पादचारी व छोट्या वाहनधारकांना मार्गक्रमण करणे जिकरीचे झाले आहे.
वाहतूक कोंडीही वाढली : अवजड वाहनांची दिवसभर वर्दळ वाढली आहे. अगोदरच या भागात विनयनगर ते पांडवनगरीदरम्यान दोन्ही बाजूंना दुकाने असल्याने तेथे खरेदीसाठी गर्दी असते. त्यातच रस्त्यालगत प्राथमिक व माध्यमिक विद्यालय असल्याने विद्यार्थ्यांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत अवजड वाहनांमुळे त्यात भर पडली असून वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. त्यामुळे पादचाऱ्यांना चालणेदेखील मुश्कील झाले आहे.
दोन वेळा गॅस टँकरचे अपघात
वर्षभरात दोन वेळा गॅस टँकरचे अपघात झाले आहे. सुमारे आठ महिन्यांपूर्वी पाथर्डी गाव चौफुलीलगत रस्त्यावर गॅसने भरलेला टँकर उलटला होता. त्यानंतर चार महिन्यांपूर्वी कलानगर चौकालगत श्री श्री रविशंकर मार्गावर दुभाजकावर गॅस टँकर चढून अपघात झाला होता.
दहाहून अधिक अपघात; पोलिसांकडून दुर्लक्षच
द्वारका चौकातून अवजड वाहनांची ये-जा बंद करून पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा-इंदिरानगर-पाथर्डी रस्त्याने वळविण्यात आली. परिणामी या मार्गाचा वापर करणाऱ्या स्थानिक नागरिकांसह व्यापारी व विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. मागील वर्षभरात या रस्त्यावर दहाहून अधिक अपघात झाले आहे. आता अजून जीवितहानीची वाट न बघता या रस्त्यावर तातडीने अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात यावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.
परिसरातील ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वडाळा-इंदिरानगर-पाथर्डी या ठिकाणी पूर्णपणे नागरी वस्ती आहे. याच रस्त्यावरून अवजड वाहनांची ये-जा वाढल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. मागील वर्षापासून या वडाळा-इंदिरानगर-पाथर्डीरोडवरून अवजड वाहतूक वळविण्यात आली आहे. या मार्गावर सकाळी व सायंकाळी कलानगर चौक ते पाथर्डीगाव रस्त्यावर ज्येष्ठ नागरिक फेरफटका मारण्यासाठी येतात. अतिशय वर्दळीच्या या रस्त्यावर अवजड वाहनांमुळे अपघात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
पोलिस आयुक्तांकडून मागणीकडे दुर्लक्ष
द्वारका चौकातून निर्बंध घालण्यात आलेले मालट्रक, ट्रेलर कंटेनर, टँकरची वाहतूक वडाळागाव, कलानगर चौक, वडाळा-पाथर्डी रस्त्यावरून वळविण्यात आली आहे. त्यामुळे पादचारी व वाहनधारकांना रस्त्यावरून मार्गक्रमण करणे जिकिरीचे झाले आहे. या रस्त्यावरून जीवघेणी अवजड वाहनांची वाहतूक बंद करावी अशा मागणीचे निवेदन तत्कालीन पोलिस आयुक्तांना देऊनही अद्यापपर्यंत गॅस टँकर व अवजड वाहनांची वाहतूक बंद झालेली नाही.
ज्येष्ठांमध्ये भीती
अवजड वाहने वेगाने धावतात. परिसरात सेवानिवृत्त व ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. ते सकाळी व सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडतात. बेफाम वाहनांच्या कर्कश हॉर्नमुळे छातीत धडकी भरते. - विकास पाडगावकर, ज्येष्ठ नागरिक
अवजड वाहतूक बंद करा
अवजड वाहनांची वाहतूक सुरू केल्याने प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. तसेच कलानगर ते पाथर्डी गाव या रस्त्यावर शाळा व महाविद्यालय असल्याने वर्दळ सुरू असते. त्यामुळे अवजड वाहनांची वाहतूक भरवस्तीतून बंद करण्यात यावी.- सचिन सूर्यवंशी, शिक्षक, केबीएच विद्यालय
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.