आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दैन्यावस्था:138 कोटींच्या घाटांची लागली वाट; शहराच्या सौंदर्यात भर घालणारे घाट आता टवाळखोरांचे आश्रयस्थान

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंहस्थात शहरात लाखोंच्या संख्येने आलेल्या भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने गोदाकाठी टाळकुटेश्वर मंदिर ते कन्नमावर पूल, टाकळी परिसर व दसक-पंचक परिसरात स्नान घाट उभारले होते. घाटांच्या क्राँकिटीकरणासह प्रकाशव्यवस्था, रंगसंगती, बॅरिकेड‌्स आदी सुविधांसाठी तब्बल १३८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या या घाटांची पालिकेकडून देखभाल केली जात नसल्याने दयनीय अवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी घाटाची तुटफूट झाली असून त्यावर कचऱ्यांचे साम्राज्य पसरले आहे.

पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे घाटाची दयनीय अवस्था झाली असून शहराच्या विकासात भर घालणारे हे घाट अंतिम घटका मोजत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. पालिकेच्या वतीने सिंहस्थाचे आयोजन यशस्वी करून दाखविल्याचा मोठा गाजावाजा करण्यात आला. मात्र, दुसरीकडे सिंहस्थादरम्यान शहरात केलेली विविध कामे अथवा प्राप्त झालेल्या साहित्याची देखभालीअभावी दुरवस्था झाली आहे. लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांची रामकुंड परिसरात गर्दी होऊ नये या दृष्टीने व गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाच्या वतीने गोदावरी नदीलगत घाट विकसित करण्यात आले होते.

आकर्षक रंगसंगती, हायमास्टद्वारे केलेली विद्युत व्यवस्था, लोखंडी बॅरिकेडिंग, क्राँकिटीकरण केलेले घाट यामुळे भाविकांसह पर्यटकांना हे घाट आर्कषित करत होते. मात्र कुंभमेळा पार पडताच या घाटाच्या देखभाल दुरुस्तीकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सोयीस्कर दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी या घाट परिसरात ठिकठिकाणी साचलेला कचरा, गाळ अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. तसेच या ठिकाणी लावलेले हायमास्टही चोरीस गेले आहेत. सद्यस्थितीला या घाटाला ओंगळवाणे स्वरूप प्राप्त झाले आहे. यामुळे भाविक तसेच नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

सर्वेक्षणाचा गाजावाजा, प्रत्यक्षात स्वच्छतेचा विसर : स्वच्छ भारत अभियानांतर्गत करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात नाशिकची कामगिरी उंचावी यासाठी पालिकेने मोठा गाजावाला केला. घाटावर ठिकठिकाणी फलक लावले. मात्र दुसरीकडे घाट परिसरात ठिकठिकाणी साचलेला कचरा, गाळ यामुळे या परिसराला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाल्याचे दिसून येत आहे.

बातम्या आणखी आहेत...