आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासुपरमार्केटमध्ये वाइन विक्रीच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयावर माेठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्यामुळे या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईल की नाही याबाबत शंका आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने वाइन विक्रीबाबतचा मसुदा जाहीर केला आहे. त्यावर जनतेकडून २९ जूनपर्यंत सूचना व हरकती मागवल्या आहेत. आता राज्यातील नागरिक काय काैल देतात यावर शासनाच्या या निर्णयाचे भवितव्य अवलंबून असेल.
सुपरमार्केटमध्ये वाइनची विक्री करण्याचा निर्णय शासनाने घेतला असल्याच्या बातम्या येताच त्याला प्रचंड विरोध राज्यातून झाला होता. किराणा दुकानात वाइनची विक्री झाली तर कुटुंबासह खरेदीला तेथे जाणे याेग्य असेल का? अशा दुकानांत का जावे? मुलांवर याचा वाईट परिणाम होईल, असे प्रश्न उपस्थित केले गेले होते. तर काही दुकानदारांनी ग्राहकांची संख्या यामुळे घटेल हे लक्षात घेऊन वाइन विक्रीला न ठेवण्याची भूमिका स्पष्ट केली होती. शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय असल्याचे सांगितले जात होते. आता हा विषय पुन्हा चर्चेत येणार आहे.
सूचना, हरकती येथे नोंदवा
सुपरमार्केटमध्ये वाइन विक्री ्बाबतच्या मसुद्यावर जनतेला सूचना, हरकती मांडता येणार असून याकरिता आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क विभाग, दुसरा मजला, जुने जकात घर, शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट, मुंबई-४०० ०२३ येथे लेखी स्वरूपात किंवा dycomm-inspection@mah.gov.in या मेल आयडीवर नोंदवता येतील. http//stateexice.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मसुदा जाहीर करण्यात आल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.
‘दिव्य मराठी’च्या सर्व्हेत महिलांचा विरोध
महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाबाबत दैनिक दिव्य मराठीने राज्यातील महिलांची मते मागवली होती. त्यात साडेपाच हजारहून अधिक महिला सहभागी झाल्या होत्या. त्यापैकी ८७.८ टक्के महिलांनी किराणा दुकान, सुपरशाॅपीमध्ये वाइन विक्रीला विरोध केला होता. त्यावरून राज्यातील जनतेकडून विशेषत: महिलांकडून या निर्णयाला तीव्र विरोध होत असल्याचे समाेर आले होते. आता शासनाकडे यापैकी किती लाेक आक्षेप नोंदवतात त्यावर या निर्णयाचे भवितव्य अवलंबून आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.